May20
Posted by Mr. Sanjay Nehe on Wednesday, 20th May 2015
चैतन्यवर्षा १: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरआपल्या अंतरंगात अजरामर असे वैश्वीक चैतन्य आहे आणि आपले जीवन म्हणजे त्या चैतन्याचा अंश आहे असे लहानपणापासून ऐकत आलो. पण ते चैतन्य काय व कसे असते हे माहीत नव्हते.
अशा परिस्थितीत; जेव्हा आपल्यामधील उणीवा आणि दोष सलत होते आणि जगातील समस्या मनाला भेडसावीत होत्या; तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या द्वारे; सर्वान्तर्यामीचे हे चैतन्य म्हणजेच नाम असून या चैतन्याचा अनुभव घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे नामस्मरण आहे हे समजू लागले. तसेच नामस्मरण हा सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाचा राजमार्ग आहे; हे कळू लागले.
एकाद्या रोग्याला त्याच्या रोगावरील उपाय सापडल्यावर ज्याप्रमाणे तो रोगी त्याच्यासारख्या इतर रोग्यांना तो उपाय सांगू लागतो त्याप्रमाणे नामस्मरणावर मी पुस्तके लिहायला सुरुवात केली. नामस्मरणाचे साधन जगात सर्वदूर पसरले पाहिजे असा ध्यास लागला.
आज जेव्हा जाणवले की अंतर्बाह्य व्यापणाऱ्या नामचैतन्याचा जगात सर्वत्र वर्षाव होत आहे तेव्हा मन एकदम शांत आणि प्रफुल्लीत झाले! जगभर बरसणारी ही नामचैतन्यवर्षा मनाने चिंब भिजण्यासाठी आणि नामचैतन्यमय होण्यासाठी आपणा सर्वांना सुवर्णसंधी आहे; ह्या जाणीवेने ऊर कृतज्ञतेने भरून गेला!
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:
गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै: श्री गुरवे नम: