May27
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 27th May 2015
योग्य वेळ: डॉ. श्रीनिवास कशाळीकरकोणतीही बाब घडण्यासाठी योग्य वेळ येणे गरजेचे असते. व्यक्ती, संस्था, समाज, देश किंवा संपूर्ण विश्व; सर्वांच्या बाबतीत हे खर आहे! विशिष्ट व्यक्तीच्या, संस्थेच्या, समाजाच्या, देशाच्या किंवा अखिल विश्वाच्या सर्वंकष कल्याणाची वेळ आली की अनादी कालापासून अंतर्बाह्य बरसणारी चैतन्यवर्षा जड, स्थूल आणि दृश्य जगाच्या आरपार; दिसू लागते आणि आवाक्यात येते! अशी योग्य वेळ आज आली आहे! साऱ्या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून उरलेली चैतन्यवर्षा दिसू लागली आहे आणि सर्वांच्या आवाक्यात आली आहे!
केवळ भारताच्या नव्हे तर एकीकडे जगाच्या कोनाकोपऱ्यात; चैतन्यवर्षा होत आहे आणि त्याचवेळी ते चैतन्य आकंठ पिण्यासाठी जगभरातले तहानलेले लोक हिरीरीने पुढे सरसावताना दिसत आहेत! असा समसमायोग येणे म्हणजे अभूतपूर्व सुवर्णकालाची नांदीच होय!
कुणी नामस्मरण म्हणतो तर कुणी जिक्र, कुणी जप म्हणतो तर कुणी जाप, कुणी सिमरन म्हणतो तर कुणी सुमिरन; प्रत्येकजण आपल्या स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरंगातील चैतन्यपान करण्यासाठी आणि नामचैतन्यमय होउन परस्परातले एकत्व अनुभवण्यासाठी आसुसलेला दिसत आहे!
नामस्मरणाचा प्रसार आणि प्रचार विविध मार्गांनी आणि विविध माध्यमांतून करणारे दृष्टीमध्ये ठळकपणे भरतात. रामकथा, भागवतकथा, नामजपसप्ताह, नामसंकीर्तन इत्यादींमध्ये सामील असणारे उघडपणे दिसतात. तीर्थयात्रा करणारे, मंदिरात जाणारे, सत्संग करणारे वगैरे लोक देखील पटकन नजरेत भरतात. पण आपण जर अंतरंग पाहू लागलो तर असे आढळते आहे की वरपांगी नामस्मरणाला नाकारणारे आणि स्वत:ला नास्तिक म्हणवणारे देखील सलोख्याने एकत्र येण्याच्या आणि उन्नत होण्याच्या ह्या प्रक्रियेत सामावण्यासाठी अंतर्यामी उत्सुक आहेत! बाहेरून नामस्मरणाबद्दल उदासीन भासणारे नामचैतन्यमय होण्याच्या मन:स्थितीत आहेत! एवढेच नव्हे तर; अहंकारात, वैफल्यात, गर्वात, गुन्हेगारीत, व्यसनात, गरीबीत, अज्ञानात, व्याधींमध्ये, वार्धक्यात आणि अपंगत्वात अडकलेले आणि गुरफटलेले असहाय्य जीव देखील अंतर्यामी नामसंजीवनीसाठी व्याकूळ झाले असून त्यांचे प्राण कंठाला आलेले आहेत! थोडक्यात सांगायचे तर; गुन्हेगारीच्या, पापाच्या, किंवा न्यूनतेच्या भावनेने होरपळणाऱ्या आपणा सर्वांना कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून चैतन्यवर्षा दिसू लागण्याची आणि तिची अनुभूती मिळण्याची वेळ आली आहे!