Aug19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 19th August 2015
कुंभमेळा आणि अमृतकुंभ: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरशिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील कुंभमेळ्याच्या पुण्यपर्वाच्या निमित्ताने होणारा जिव्हाळ्याचा सुसंवाद.
१.
विद्यार्थी: कुंभ मेळा म्हणजे काय?
शिक्षक: कुंभ म्हणजे गाडगे, मडके, माठ किंवा कलश. मेळा म्हणजे एकत्र जमलेला समूह.
विद्यार्थी: कुंभ मेळ्याची सुरवात केव्हां झाली? कुंभ मेळा हे नाव कसे पडले?
शिक्षक: ह्या बाबींचा खुलासा पौराणिक किंवा ऐतिहासिक संदर्भ शोधले तर मिळतो. तो खुलासा असा: फार पूर्वी अमृतमंथन ह्या नावाची एक महान घटना घडली. ह्या घटनेच्या कथेनुसार देव (सुर) आणि दानव (असुर) ह्यांनी क्षीरसमुद्रात मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून हे अमृतमंथन केले गेले.
विद्यार्थी: अमृतमंथन म्हणजे काय?
शिक्षक: अमृत म्हणजे चिरंजीव बनवणारे पेय! दुसऱ्या अर्थाने अमृत म्हणजे अमरत्व, चिरंजीवीता! मंथन म्हणजे घुसळणे. ज्या मंथनातून अमृत तयार झाले त्या मंथनाला म्हणजेच घुसळण्याला अमृतमंथन म्हणतात.
ह्या कथेचा पुढचा भाग असा की मंथनातून अमृत निघाल्यावर त्याच्या प्राप्तीसाठी देव आणि दानवांमध्ये झगडा सुरु झाला. ह्या झगड्यादरम्यानच्या हिसका-हिसकीमध्ये; हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक ह्या चार ठिकाणी, चार वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ग्रहस्थिती असताना अमृत सांडले.
विद्यार्थी: तुमच्या मते ही सांकेतिक घटना असावी?
शिक्षक: होय. माझ्या मते, अमृतमंथनाच्या कथेला वेगळे परिमाण आहे आणि वेगळा गर्भितार्थ आहे. वास्तविक पाहता खरे खुरे अमृतमंथन हे आपल्या पेशींमध्ये, अंत:स्त्रावी ग्रंथींमध्ये आणि मज्जासंस्थेमध्ये, अप्रतिहतपणे होत असते. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजे झोप ह्या तीनही अवस्थांमध्ये होत असते. कारण अमृतमंथन ही एक अहर्निश आणि अनंत कालपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे.
रवी म्हणून उपयोगात आणलेला मंदार पर्वत हे आपल्या मज्जारज्जूचे आणि वासुकी हे संवेदनावाहक नाड्यांचे प्रतीक आहे. तसेच ह्या नाड्यांना उर्ध्वगामी आणि अधोगामी पद्धतींनी चेतवणाऱ्या शक्ती महणजे अनुक्रमे देव (सुर) आणि दानव (असुर) आहेत. साहजिकच बऱ्या (देव) आणि वाईटा (दानव) मधील रस्सीखेच आणि संघर्ष निरंतर चालू आहे!