Aug19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 19th August 2015
कुंभमेळा पुण्यपर्वाच्या निमित्ताने: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: कुंभ मेळ्याच्या वेळी आपल्यामध्ये होणाऱ्या किंवा होऊ शकत असणाऱ्या ह्या बदलांचा आणि अमृताचा काय संबंध?
शिक्षक: ज्यांना हा शोध लागला, त्यांच्या निरीक्षणानुसार, अनुमानानुसार किंवा अनुभवानुसार; हे वैशिष्ट्यपूर्ण बदल आपल्याला; आपल्या खऱ्या “स्व” कडे नेणारे म्हणजेच, सच्चिदानंदाकडे नेणारे म्हणजेच अमर करणारे, म्हणजेच पुण्यदायी, उर्ध्वगामी किंवा मुक्तिदायी पद्धतीचे असतात. त्यामुळे ह्या बदलांना दोन शब्दांत म्हणजेच “अमृत सांडणे” ह्या शब्दांत वर्णन केले गेले.
विद्यार्थी: माझा एक मूलभूत प्रश्न आहे. खरोखर माणूस अमर होऊ शकतो का? की हा एक भ्रम आहे? जर मी मुळात मर्त्य असेन तर अमर कसा होणार? माझ्या अस्तित्वाचा कोणता मर्त्य पैलू अमर होतो? आजपर्यंत अशा तऱ्हेने कोण अमर झाला? उलटपक्षी; मुळात जर मी “अमर असेन” तर, मी “अमर होतो” ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे?
शिक्षक: तुझा प्रश्न एकदम रास्त आहे! वास्तविक पाहता; आपण पूर्णपणे मर्त्यही असत नाही आणि पूर्णपणे अमर देखील असत नाही! आपल्या अस्तित्वाचा काही भाग मर्त्य असतो आणि काही भाग अमर असतो. पण; आपण मर्त्य भागाशी (जडत्वाशी) तद्रुप होऊन राहिल्यामुळे; अमरत्वाच्या (चैतन्याच्या) अनुभवाला मुकलेले असतो! परिणामी; आपण मर्त्य आणि संकुचित बनून संकुचित ध्येय, संकुचित विचार, संकुचित स्वार्थ यांच्या योगे; मर्त्य आणि संकुचित अवस्थेतच (अमरत्वाच्या अनुभवाविना) मरून जातो!
विद्यार्थी: म्हणजे ह्याची देही ह्याची डोळा; अमरत्वाचा अनुभव येऊ शकतो? कसा असतो हा अनुभव?
शिक्षक: नामस्मरणाद्वारे; किंवा अन्य मार्गाने सद्बुद्धी, सद्विचार, सद्भावना, सद्वासना सत्संकल्प, सत्कार्य (स्वधर्म) ह्याच्या योगे; स्वत:चे आणि इतरांचे सर्वांगीण कल्याण साधत साधत निर्भयपणे स्वस्थ होण्याचा अनुभव. हे आंतरिक स्थित्यंतर असते!
विद्यार्थी: तुमच्या मते; कुंभ मेळ्याचा वेळी त्या त्या ठिकाणी स्नान केल्याने असा चैतन्याचा किंवा अमरत्वाचा अनुभव येतो?
शिक्षक: ते तेवढे सोपे नाही. कारण आपण आपल्यातील जडत्वाशी इतके तादात्म्य पावलेले असतो, की एकदा किंवा अनेकदा निव्वळ स्नान करून आपल्याला अमरत्वाचा किंवा चैतन्याचा अनुभव येईलच असे सांगता येत नाही! पण कुंभ मेळा किंवा इतर तीर्थयात्रा यांचा मूळ हेतू हाच आहे ह्यात शंका नाही!