Aug19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 19th August 2015
लोककल्याणाचा पर्यायी मार्ग : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरशिक्षक: कुंभ मेळ्यामध्ये पोचणे कोट्यावधी गरीब, आजारी, वृद्ध, अपंग व नाजूक स्थितीतील लोकांना शक्य होत नाही हे अगदी खरे आहे! त्याचप्रमाणे कोट्यावधी लोकांची कुंभ मेळ्याच्या जागी सोय करणे हे सरकारला देखील वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीत शक्य असेलच असे नाही. साहजिकच कुंभ मेळ्यामध्ये आणि इतर तीर्थक्षेत्रांमध्ये देखील अन्न, पाणी, निवारा, शौचालये, स्नानगृहे, सुरक्षा इत्यादिंची सोय करणे सरकारला शक्य होईलच असे नाही! अशा वेळी लोककल्याणाचा पर्यायी मार्ग तयार असणे आणि माहीत असणे अत्यंत महत्वाचे आहे!
विद्यार्थी: तुमच्या मते नामस्मरण हा असा पर्यायी मार्ग आहे?
शिक्षक: होय! नक्कीच! ह्या सर्व बाबींचा विचार केला तर, नामस्मरण हा निव्वळ पर्यायी मार्गच नव्हे तर, नामस्मरण स्वीकारणे, आचरणात आणणे, आणि त्याचा प्रसार करणे ही आज आपल्या सर्वांसाठी एक दैवदुर्लभ अशी सुवर्ण संधी आहे. किंवा अन्य शब्दांत सांगायचे तर ही खरोखर ईश्वराची अजिंक्य, अजेय आणि सर्वसत्ताधीश अशी कृपाच आहे!
विद्यार्थी: तुम्ही म्हणता ते मी नाकारत नाही. पण नामस्मरण हे संपूर्ण समाजाचे कल्याण कसे करते?
शिक्षक: सर्वसामान्यपणे (नामविस्मरणामुळे) आपली उर्जा, आपले संकल्प, आपली कृती ही आपल्यातील जडत्वाकडे म्हणजेच वैयक्तिक आणि संकुचित स्वार्थाकडे खेचली जात असते. अशा तऱ्हेने लाखो लोकांची उर्जा, संकल्प आणि कार्य जेव्हां संकुचित स्वार्थाच्या दिशेला वळतात, तेव्हां त्यातून स्वार्थांध आणि समाजद्रोही धोरणे, रूढी, परंपरा, कायदे, नियम, संकेत, योजना, कार्यक्रम इत्यादी तयार होतात! यातूनच सामूहिक अवनती होते. याउलट नामस्मरणाच्याद्वारे आपले विचार, आपल्या भावना, आपल्या वासना, आपली शक्ती आणि आपले संकल्प; उदात्त बनतात आणि आणि सामुहिक कल्याणाच्या दिशेने वळतात! अशा तऱ्हेने लाखो लोकांचे विचार, भावना, वासना, शक्ती आणि संकल्प; एकत्र काम करू लागले, की समष्टीच्या कल्याणाचे भव्य दिव्य पर्व सुरु होते!
अणुबॉम्ब किंवा हैड्रोजनबॉम्ब ह्या विनाशक बॉम्बनी एकाच वेळी लाखो लोक मरतात; तर नामस्मरण ह्या “विधायक बॉम्बने” एकाच वेळी लाखो लोक उन्नत होतात!
युद्धाच्यावेळी रणभेरी वाजू लागल्या की योद्ध्यांच्या अंगात जशी एकदम वीरश्री संचारते, तसे, नामस्मरणाने लाखो जीवांच्या आंत कळत-नकळत एकदम चैतन्य संचारते! आपण नामस्मरण करू लागलो की आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला अंतर्बाह्य व्यापणारी; उर्ध्वगामी उत्क्रांती सुरु होते.