Aug19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 19th August 2015
ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे? डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: खरोखर आपण अमर होऊ शकतो का? की हा एक भ्रम आहे? जर आपण मुळात मर्त्य असू तर अमर कसे होणार? आपल्या अस्तित्वाचा कोणता मर्त्य पैलू अमर होतो? आजपर्यंत अशा तऱ्हेने कोण अमर झाला आहे? उलटपक्षी; मुळात जर आपण “अमर” असू, तर मी “अमर होतो” ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे?
शिक्षक: वास्तविक पाहता; आपण पूर्णपणे मर्त्यही असत नाही आणि पूर्णपणे अमर देखील असत नाही! आपल्या अस्तित्वाचा काही भाग मर्त्य असतो आणि काही भाग अमर असतो. पण; नामविस्मरणामुळे आपण मर्त्य भागाशी (जडत्वाशी) तद्रुप होऊन राहिल्यामुळे; अमरत्वाच्या (चैतन्याच्या) अनुभवाला मुकलेले असतो! परिणामी; आपण मर्त्य आणि संकुचित बनून संकुचित ध्येय, संकुचित विचार, संकुचित स्वार्थ यांच्या योगे; मर्त्य आणि संकुचित अवस्थेतच (अमरत्वाच्या अनुभवाविना) मरून जातो! नामस्मरणाने आपण आपल्यातील चैतन्याशी जोडले जातो. जडत्व कमी होत गेले की देहबुद्धी कमी होते म्हणजेच संकुचितपणा, क्षुद्रपणा, हीनपणा म्हणजेच पाप कमी होते!
अशा तऱ्हेने होणाऱ्या पापाच्या मुक्तीचेच दुसरे नाव म्हणजे सम्यक उत्क्रांती. अशा उत्क्रांतीमधूनच आपले व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने प्रगल्भ होते. आपले दृष्टिकोन, विचार, भावना, वासना आणि वागणूक कल्याणकारी होतात! म्हणूनच नामस्मरण करीत राहिल्यानेच आणि ते करता करता; आपण नावापुरते आस्तिक किंवा नास्तिक राहत नाही, संकुचित राहत नाही, तर विशाल होतो. आपण; सर्वांचे, संपूर्ण कल्याण साधण्यामध्ये; स्वत:ला झोकून दिलेले प्रकाशयात्री होतो, कल्याणयात्री होतो!
या प्रगल्भतेतूनच आपल्या स्पष्टपणे लक्षात येते; की नामविस्मरणामुळेच आपण संकुचित, उथळ आणि हीन बनलो होतो व नामविस्मरणामुळेच आपल्या जीवनात सर्वत्र आसुरी शक्तींचे थैमान सुरु होते! नामविस्मरण म्हणजे स्वत:ला विसरणे, म्हणजे स्वत:पासून तुटणे म्हणजे एक प्रकारचा आत्मद्रोह आहे. किंबहुना ते एक प्रकारचे मरणच आहे. म्हणूनच नामविस्मरण हा आत्मघात आहे. खरे पाहिले तर नामविस्मरण ही आत्महत्या आहेच; पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे नामविस्मरणामुळे स्वत:बरोबरच इतरांचे देखील चैतन्य संपून जाण्यास आणि त्यांचे अध:पतन होत होत; सर्वनाश होण्यास आपण कारणीभूत होतो. ह्या अर्थाने आपल्याला असेही म्हणता येईल की नामविस्मरण ही सर्वात मोठी पण सर्वात नजरेआड झालेली किंवा दुर्लक्षित राहिलेली अशी सर्वंकष हिंसा आहे!