World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Aug20
आ वासून पसरलेली दरी : डॉ. श्रीनिवास जनार्दन क
आ वासून पसरलेली दरी : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याचे अनुभव आपण हरघडी ऐकतो. पेपरमध्ये वाचतो. टीव्ही वर बघतो. नामस्मरणाविषयीचा तुमचा एखादा अनुभव सांगा ना!

शिक्षक: १५ ते २० वर्षांपूर्वीची हकीकत आहे. हरिश्चंद्रगडला सहल जायची होती. आपल्याला जमेल का; ह्याविषयी मला शंका होती. कारण हरिश्चंद्रगड चढणे किती कठीण आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती! पण हो ना करता करता मी सहलीला गेलो!
हसत खेळत चढताना मधून मधून दम लागला तरी तेवढ्यापुरती विश्रांती घेत घेत आम्ही चढून गेलो.
पण दुसऱ्या दिवशी जेव्हां आम्ही उतरू लागलो तेव्हां कालच्या श्रमाने पायात अक्षरश: गोळे आले आणि समोरची दरी बघून जीव घाबरून गेला. थोड्या वेळाने समोर भिंतीसारखा उभाच्या उभा पसरलेला तो कातळ (खडक) आला आणि जीवाचे पाणी पाणी झाले! मागे पाठ टेकवून; उभ्या उभ्याच खालच्या दिशेने हळू हळू सरकणे आवश्यक होते. हात पकडण्यासाठी काहीही नव्हते आणि पाय ठेवण्यासाठी जेमतेम खांचा मारलेल्या होत्या! समोरची ४००० फूट खालपर्यंत आ वासून पसरलेली दरी छातीचा थरकाप उडवत होती!
खडकाच्या नेमका मध्यवर पोचतो न पोचतो तोवर पाय थरथरू लागले! मागे, पुढे, वर, खाली, डावीकडे, उजवीकडे कुठेही आणि कोणताही आधार नव्हता! कुणाचा हात मागणे म्हणजे स्वत:बरोबर दरीत पडण्याचे त्याला आमंत्रण देणे!
कोणतेही वैद्यकीय ज्ञान, तंत्रज्ञान, औषध, पाणी, पैसा अडका अशी कुणाचीही कोणतीही मदत मला उपयोगी पडू शकत नव्हती; हे जेव्हां माझ्या ध्यानात आले तेव्हां मी थिजून गेलो! माझे सर्व काही; क्षणार्धात समोरच्या दरीत रसातळाला जाणार होते! आपले अस्तित्व पूर्णपणे संपणार आहे; ह्या भयावह विचाराबरोबर मनात प्रश्न आला; आता उरणार काय? माझ्याबरोबर सर्व विश्वच नष्ट झाल्यावर शिल्लक काय राहणार आहे?
अकस्मात् वीज पडावी तसा लख्ख प्रकाश पडला; माझ्यासकट सर्व नष्ट झाले तरी अनंतकालपर्यंत शिल्लक आणि टिकून राहणारच राहणार असे तत्व आहे माझ्या अंतर्यामी आहे आणि ते म्हणजे नाम! अशा तऱ्हेने ज्या क्षणी नामस्मरण झाले, त्याच क्षणी मी वाऱ्याच्या झुळकीसारखा तरंगत; बघता बघता त्या विशाल खडकाच्या पायथ्यापाशी आलो!
अशा तऱ्हेने आपले जगणे-मरणे आणि बाकी सर्व देखील आपला अंतरात्मा, गुरु, किंवा नामाचीच लीला नाही काय? खरे सांगतो, ह्या अनुभवातून सगळे संकुचित पूर्वग्रह, हट्टाग्रह आणि अभिनिवेश संपत जातात. ह्यातूनच नामनिष्ठा वाढू लागते आणि वैयक्तिक व सामाजिक जीवनात चैतन्य बहरू लागते.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1045)  |  User Rating
Rate It


Browse Archive