Aug20
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Thursday, 20th August 2015
चैतन्याविषयीची निष्ठा: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरशिक्षक: कुंभ मेळ्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये हजारो घटना घडत असतात. पण त्यातल्या काही आपल्या अधोगतीला कारणीभूत असतात तर काही उन्नतीला. ज्या बाबी भगवंताच्या नामाविषयीची; म्हणजेच भगवंताविषयीची; म्हणजेच आपल्या अंतर्यामीच्या चैतन्याविषयीची निष्ठा कमी करतात आणि ज्यांमुळे आपण अधिकाधिक सुस्त, बेपर्वा, संकुचित, असहिष्णू, बेचैन, परावलंबी, लाचार किंवा क्रूर बनतो, त्या सर्व बाबी घातक असतात. ज्या बाबी भगवंताच्या नामाविषयीची; म्हणजेच भगवंताविषयीची; म्हणजेच आपल्या अंतर्यामीच्या चैतन्याविषयीची निष्ठा वाढवतात त्या कल्याणकारी असतात.
विद्यार्थी: कुंभ मेळ्याला नावे ठेवण्यापूर्वी किंवा त्याचा उदो उदो करण्यापूर्वी सर्वच घटना किंवा बाबी आपण ह्या निकषावर तपासल्या पाहिजेत!
शिक्षक: अगदी बरोबर आहे. किंबहुना आपले संपूर्ण जीवनच ह्या निकषानुसार जर विकसित करता आले तर कल्याणकारी होईल. आपल्याकडे जे समाजकारण, राजकारण व अर्थकारण चालते, ते जर अध्यात्मावर आधारित आणि अध्यात्मकेंद्रित असेल तर ते सर्वांच्या हिताचे होईल आणि सर्वांच्या आकांक्षा पूर्ण होतील. त्यातूनच सर्वांचे आर्त, तृप्त होईल.
विद्यार्थी: ते कसे काय?
शिक्षक: हे पहा; विश्वाच्या आणि आपल्या सर्वांच्या अंतर्बाह्य; सर्वत्र असणाऱ्या चैतन्याला आपण सच्चिदानंद म्हणतो. सत् म्हणजे चिरंतन, चिद् म्हणजे चैतन्यमय आणि आनंद म्हणजे प्रसन्नता. हे अजरामर चैतन्य अनादी आणि अनंत आहे. ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण प्रत्येक कणाकणामध्ये असते, त्याप्रमाणे अंतर्बाह्य व्यापणाऱ्या चैतन्याची ओढ प्रत्येक जीवात असते! ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण अनिवार्य आणि अपरिहार्य असते त्याचप्रमाणे ही ओढ अनिवार्य आणि अपरिहार्य असते. आणि ह्या ओढीलाच संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज विश्वाचे आर्त म्हणतात. पण प्रत्येक निर्जीव कणाला ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचे ज्ञान असत नाही त्याप्रमाणे प्रत्येक सूक्ष्म जीवाला, वनस्पतीला किंवा प्राण्याला स्वत:ची सच्चिदानंदाची ओढ, स्वत:चे आर्त; जाणवत नाही! पण ते आर्त जाणवो वा न जाणवो; ते असतेच असते; आणि ते अपरिहार्य असते!
अशा तऱ्हेने हे आर्त सर्वांचेच असल्यामुळे ह्याभोवती सर्व धोरणे, कायदे, नियम, योजना, कार्यक्रम आंखले की ते सर्वांना समाधान देउ लागतात. उदाहरणार्थ; आंतरिक चैतन्याची म्हणजेच नामाची आठवण आणि पूजा ज्या स्थानी होते आणि ज्या व्यक्तींकडून होते, ती स्थाने आणि त्या व्यक्ती समाजाचे मूलाधार असतात. त्यामुळे त्यांना जपणे, जतन करणे आणि जोपासणे हे शासनकर्त्यांचे सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे.