Aug22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 22nd August 2015
वेगवेगळी देवस्थाने: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: केवळ कुंभ मेळ्यामध्येच नव्हे तर आपल्याकडे जी वेगवेगळी देवस्थाने आहेत तिथला भपका देखील पुष्कळदा खटकतो.
शिक्षक: हे अगदी खरे आहे. आपल्या देशात कमालीची गरीबी आहे हे खरे आहे. त्यावर इलाज होणे अत्यावश्यक आहे हे देखील खरे आहे. पण समजा; असा झगमगाट बंद केला तर काय होईल? गरीबी दूर होईल? झगमगाटावरील पैसे गरीबांना वाटले तर ते श्रीमंत होतील? त्यांचे कल्याण होईल? त्यांचे कल्याण होणे म्हणजे तरी काय? केवळ पैसे मिळणे आणि ते वाट्टेल तसे उधळता येणे म्हणजे कल्याण होणे का?
विद्यार्थी: केवळ पैसे मिळणे म्हणजे कल्याण नव्हे. पण जेव्हां परिस्थिती आणीबाणीची आणि गंभीर असते; आणि समस्या जीवनमरणाची असते; तेव्हां गरीबांना ताबडतोब आणि थेट मदत मिळायला नको का? आपली परिस्थिती गंभीर नसल्यामुळे आपण गरीबांच्या हलाखीचा विचार करू शकत नाही! आपण फक्त गरीबीच्या मूळ कारणांचाच आणि केवळ त्यांवरील उपायांचाच विचार करतो.
शिक्षक: केवळ मूळ कारणांचा आणि त्यावरील उपायांचा विचार करणे अवास्तव आहे. पण; गरीबांना ताबडतोब मदत होणे हे जसे महत्वाचे आहे तसे; गरीबीची मूळ करणे दूर करणे देखील अत्यावश्यक आहे. खरे म्हणजे प्रत्यक्षात हे देखील एक चक्र आहे! गरीबीची समस्या केवळ गरीबीपुरती मर्यादित नाही. ती श्रीमंतीशी अविभाज्यपणे निगडीत आहे. आपल्या गरीबी आणि श्रीमंती; दोन्हींच्या मुळाशी तमोगुण आणि रजोगुण असून; त्यामुळे आपली गरीबी आणि आपली श्रीमंती दोन्ही विकृत बनल्या आहेत आणि परस्पर पूरक आणि परस्पर पोषक बनल्या आहेत! आपण सर्वचजण; गरीब असो वा श्रीमंत; दु:स्थितीतच आहोत! म्हणूनच आपल्या दु:स्थितीचे मूळ कारण (तमोगुण आणि रजोगुण) आणि तात्कालिक परिस्थिती या दोन्हींवर एकदमच उपाय करण्यासाठी नामस्मरण आणि तज्जन्य स्वधर्म हेच हवेत! केवळ तात्पुरत्या मदतीची ठिगळे लावून तात्पुरता आणि वरवरचा फायदा होईल खरा; पण केवळ तात्पुरती मदतच करीत राहिले तर तमोगुण आणि रजोगुण फोफावत जातील; आणि आपण आळस, बेपर्वाई, लाचारी, बेशिस्त, लबाडी, निर्दयता, वखवख, दिखाऊपणा, उथळपणा ह्यात तडफडत राहू! किंबहुना आज हेच चालले आहे!
नामस्मरणाने आंतरिक चैतन्याचा अनुभव येईल आणि आंतरिक सामर्थ्याची प्रचीती येईल. त्यातूनच स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी धैर्याने जगण्याचा आणि झटण्याचा उत्साह येईल. स्वधर्म प्रत्यक्षात येईल. जेव्हां जीवनाची सर्व क्षेत्रे आणि सर्व स्थळे; नामस्मरणाने भरून आणि भारून जातील; तेव्हां मंदिरांच्या एकांगी आणि अतिरिक्त झगमगाटाची गरज राहणार नाही.