Aug22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 22nd August 2015
नामात गोडी लागेपर्यंत: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: आमच्यासारख्या लाखो लोकांना नामात गोडी लागेपर्यंत आनंददायक आणि उत्साहवर्धक अशा कुंभमेळ्याचा आणि इतर अनेक रूढी परंपरांचा उपयोग आहे हे खरेच आहे!
शिक्षक: निश्चित! चैतन्यविस्मृतीच्या अंध:कारातून, गदारोळातून आणि तणावातून मुक्त होण्यासाठी चैतन्य स्मृती हेच उत्तर आहे ह्याची जाणीव अधिकाधिक प्रकर्षाने होत असल्याने कुंभ मेळ्यासारख्या सर्व प्रथांमध्ये देखील अंतरात्म्याचे स्मरण अर्थात नामस्मरण हे प्रधान कर्म बनत आहे. नामस्मरणाला कुणी जप, म्हणतो तर कुणी जाप, कुणी सुमिरन म्हणतो तर कुणी सिमरन, कुणी जिक्र म्हणतो तर कुणी अंतरात्म्याचे स्मरण. पण मथितार्थ एकच!
आनंदाची बाब अशी की; चैतन्यविस्मृतीच्या गडद अंध:काराचा अंत होऊन चैतन्याचा प्रकाश जगभर पसरू लागला आहे!
केवळ भारतच नव्हे तर चीन, पाकिस्तान, बांगला देश वगैरे इतर आशियाई देशात आणि आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आदि सर्व खंडांमध्ये घराघरातून नामस्मरणाविषयी कुतुहूल आणि जागृती वाढताना दिसते आहे. मालक, संचालक आणि व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना, शिक्षक विद्यार्थ्याना, डॉक्टर रुग्णांना, प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या चाहत्यांना आणि नेते अनुयायांना; नामस्मरणाचे महत्व खऱ्या तळमळीने सांगू लागले आहेत. पालक त्यांच्या मुलांना अगदी मनापासून नामस्मरण करायला शिकवू लागले आहेत. आपआपल्या धर्मानुसार आणि परंपरेनुसार नामस्मरण करण्याची जणू काही एक प्रचंड आणि विश्वव्यापी त्सुनामी लाट आली आहे. विश्वचैतन्याचा अनुभव घेणे आणि तो इतरांना सांगणे ही आस्थेची, नित्याची आणि सार्वत्रिक बाब झाली आहे.
मंदिरामंदिरामधून नामजपाचे सप्ताह आणि अनुष्ठाने होऊ लागली आहेत. नामसाधना कशी करावी ह्याचे मार्गदर्शन करणारी नामसाधना शिबिरे होऊ लागली आहेत. केवळ धार्मिक ठिकाणी आणि अध्यात्मिक संस्थांमध्येच नव्हे तर वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, दवाखाने, दुकाने, प्रयोगशाळा, अंगणवाड्या, बालवाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी नामस्मरणाचा दिव्य प्रकाश पसरताना दिसत आहे. पोलीसांच्या चौक्यांमधून आणि सैनिकी संस्थांमधून देखील नामस्मरणाची संजीवनी आपले संजीवक काम करताना दिसत आहे.
शेतकरी, कष्टकरी, तंत्रज्ञ, कारागीर, क्रीडापटू, कलाकार, बुद्धीजीवी, व्यवस्थापक, शासनकर्ते, सत्ताधारी असे; सर्वच जण नामस्मरणाकडे आकर्षित होत आहेत. एवढेच नव्हे तर; आज ज्यांच्याकडे पूर्वग्रहदूषितपणामुळे तुच्छतेने किंवा तिरस्काराने पाहिले जाते अशा अनेक व्यवसायांमधले व्यावसायिक देखील नामस्मरण करू लागले आहेत!