Aug22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 22nd August 2015
ही चैतन्यप्रचीती: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये जसे लोकविलक्षण साधू दिसतात, तसे ते एरवी दिसत नाहीत. साधुदर्शनाला भारतात फार महत्व आहे. भाविकांच्या भावनेचा आदरच वाटतो. पण ह्या दरम्यान पुष्कळदा चेंगराचेंगरी होते आणि लोक मरतात; त्याचे वाईट वाटते.
शिक्षक: कुंभ मेळ्यादरम्यानच नव्हे तर इतर अनेक प्रसंगी गर्दी, बेशिस्त, उतावळेपणा आणि उन्माद नियंत्रणा बाहेर गेले की; व्यवस्थापन अशक्य होते आणि अपघात होतात. त्यामुळे प्रसंग कोणताही असो; संयम आणि शिस्त अत्यंत महत्वाचे आहेत. नामस्मरण करणाऱ्या लोकांच्या जीवनातील ठळक वैशिष्ट्ये म्हणजे संयम आणि शिस्त होय. विशेष म्हणजे साधुदर्शन केवळ काही विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट प्रसंगीच होते असे नाही.
नामस्मरण करणाऱ्या करोडो अनुयायांनी; रोजच्या धकाधकीत देखील; अजरामर संत महात्म्यांचे देहत्यागानंतरचे अचिंत्य आणि चैतन्यमय अस्तित्व वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रसंगातून अनुभवले आहे. कुणाला प्रत्यक्ष दर्शन होते तर कुणाला स्वप्नात दर्शन होते. कुणाला अशक्यप्राय अडचणीत मदत होते तर कुणाचे संकटात रक्षण होते. एक ना दोन; असंख्य प्रसंग सांगता येतील. हे प्रसंग हजारो प्रकारचे आहेत, पण ते सर्व; देहत्यागानंतरचे अमर आणि सत्तारूपी अस्तित्व अधोरेखित करणारे आहेत! देह जसा दिसू शकतो तसे संतांचे देहत्यागानंतरचे अस्तित्व सरसकट दिसत नाही हे अगदी खरे आहे. पण ज्याप्रमाणे शक्ती आणि स्फूर्तीच्या रूपाने आपल्याला रक्ताभिसरण अनुभवता येते; त्याचप्रमाणे आपली प्रगल्भता वाढली तर हे चैतन्य आपल्याला अनिर्वचनीय आनंदाच्या रुपात अनुभवता येते.
ही चैतन्यप्रचीती; संगीत–नाट्य, गणित-विज्ञान, सौंदर्य-शृंगार, वात्सल्य-करुणा, अशा एकूण एक सर्व तृषा आणि क्षुधा कायमच्या तृप्त करत जाते आणि जीवनाचे सर्वार्थाने सार्थक करते. ही प्रचीती आली असता चैतन्य आहे की नाही आणि सत्ता चैतन्याची आहे की नाही असे प्रश्न उरत नाहीत. किंबहुना, क्षणभंगुर जडत्वातून उत्पन्न होणारी कोणतीही भ्रांती उरत नाही.
आपले संपूर्ण जीवन चैतन्याच्या अपरंपार अशा लीलेचाच एक अविभाज्य भाग आहे ह्या जाणीवेने आपण स्वस्थ होतो आणि आपल्या आजूबाजूच्या तीर्थक्षेत्रांच्या, मंदिरांच्या, ग्रंथांच्या आणि साधूंच्या रुपात आढळणाऱ्या चैतन्यखुणा पूज्यभावाने न्याहाळत आणि मनोमन तृप्त होत जीवनानंद लुटत जातो!