Aug22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 22nd August 2015
चैतन्यकालाची नांदी: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: कुंभ मेळ्याच्या निमित्ताने मानवी जीवन किती वैविध्याने नटलेले आहे ह्याची थोडीफार कल्पना येते. आपली दृष्टी विशाल होण्यासाठी आणि आपल्यातील असहिष्णुता दूर होण्यासाठी अशा अनुभवांचा फार फायदा होऊ शकतो.
शिक्षक: होय. नक्कीच! आपण मध्यम वर्गीय लोक एका चाकोरीत जगतो. त्यामुळे आपली दृष्टी संकुचित बनलेली असते. त्यामुळे आपल्यापेक्षा जे जे वेगळे आहे, ते ते निकृष्ट आहे, असे समजण्याची गफलत आपण करत असतो.
कुंभ मेळ्यासारख्या मोठमोठ्या यात्रांच्या प्रसंगी हजारो प्रकारची माणसे भेटतात. आपली दृष्टी विशाल होऊ लागते. आपण जीवनातील वैविध्य सहिष्णुतेने, कौतुकाने आणि आदरपूर्वक स्वीकारू लागतो. आपल्यापुरते पाहण्याची संकुचित दृष्टी बदलू लागते. असहिष्णुता, एकलकोंडेपणा, आत्मकेंद्रीतपणा कमी होऊ लागतात. हे नामस्मरणाला आणि आंतरिक चैतन्याच्या अनुभवाला पूरक ठरते; आणि जागतिक सौहार्दासाठीही उपयुक्त ठरू शकते!
व्यक्ती, संस्था, समाज, देश किंवा संपूर्ण विश्व; सर्वांच्या बाबतीत हे खरे आहे! विशिष्ट व्यक्तीच्या, संस्थेच्या, समाजाच्या, देशाच्या किंवा अखिल विश्वाच्या सर्वंकष कल्याणाची वेळ आली की; सहिष्णुता वाढते. स्थूल आणि दृश्य जगाचा पगडा कमी होतो. मानसिक चंचलता कमी होते. चिडचिडेपणा कमी होतो. कटुत्व कमी होते. हिंसा आणि अशांतता कमी होतात.
खरे पाहता आपले मूळ; चैतन्याची जननी म्हणजेच चैतन्य आहे आणि आपले गंतव्य स्थान देखील चैतन्यच आहे. आपली भूक, तहान, आणि इतर सर्व वासना; चैतन्याच्या शोधातच आहेत. आपल्या सर्व वासना ह्या मूलत: चैतन्यशोधाचाच भाग असतात. त्यामुळेच आपल्या शरीरातील प्रत्येक वासनेला जे परिपूर्णत्व येते, ते परिपूर्णत्व आणि साफल्य त्या वासनेच्या आहारी जाऊन येत नाही; तर तेव्हाच येते, जेव्हां ती वासना चैतन्यशोधात परिवर्तीत आणि परिणत होते! नामस्मरणाने आपल्या केवळ वासनाच नव्हे तर; आपले संपूर्ण जीवन; त्यातील सर्व गुण-दोषांसकट सुजाण चैतन्यशोधात परिवर्तीत आणि परिणत होते. असा समसमायोग येणे म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील अभूतपूर्व सुवर्णकालाची वा चैतन्यकालाची नांदीच होय.
विद्यार्थी: कुंभ मेळा आणि तीर्थयात्रांचा हेतू उत्तम खरा, पण नामस्मरणाच्या योगे, समाजाची उन्नती होऊन त्या उन्नतीचे प्रतिबिंब तीर्थयात्रांमध्ये पडेल. उतावळेपणा, बेशिस्त, उन्माद इत्यादी कमी कमी होत जातील आणि सहिष्णुता, प्रेम वाढू लागतील.
शिक्षक: परिणामी; नामस्मरणाचे जागतिकीकरण होत जाईल आणि त्याद्वारे विश्वकल्याण प्रत्यक्षात येत जाईल!