Aug22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 22nd August 2015
रोजच्या जीवनात उपयोग काय?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: सर, कुंभ मेळ्यासाठी सरकार अनेक प्रकारच्या सेवा पुरवते. ह्याचा सामान्य माणसांना रोजच्या जीवनात उपयोग काय?
शिक्षक: प्रत्येक बाब; व्यावहारिक उपयोगाच्या तराजूमध्ये तोलून चालत नाही. व्यावहारिक फायदा बघूच नये असे नव्हे. पण; केवळ व्यावहारिक फायदा बघत बघत; आपले आयुष्य संपले तरी आपल्याला कृतार्थता येते का? जीवन सार्थकी लागले असे वाटते का? मनाचे अगदी समाधान झाले आणि जीवनाला पूर्णत्व आले असे होते का? नाही ना? समाजाचेही तसेच आहे. व्यावहारिक फायदा मिळवत मिळवत केवळ भौतिक दृष्ट्या संपन्न झालेले समुदाय; वैयक्तिक आणि सामाजिक प्रगल्भतेच्या अभावी अवनतीकारक दृष्टीकोन, धोरणे, कायदे, परंपरा आणि रुढींच्यामुळे आत्यंतिक संकुचितपणा, स्वार्थ, हांव, बेशिस्त, निराशा, व्यसनाधीनता, निर्दयीपणा, हिंसा; यांमुळे स्वत:च्या आणि इतरांच्या नाशाला आमंत्रण देतात.
अन्न पाणी निवारा इत्यादी बाबी जगण्यासाठी आवश्यक असतात हे खरे, पण समाजाच्या स्वास्थ्यासाठी म्हणजेच समाजातील उत्साह, उमेद, सहिष्णुता, स्नेह, सहकार्य आणि सद्भावना वाढण्यासाठी म्हणजेच पर्यायाने; आपल्या प्रत्येकाच्या जगण्यासाठी; सत्याची, अंतीम समाधानाची म्हणजेच जीवनाच्या सार्थकतेची कास धरणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. कुंभ मेळ्यामधून अशी कास धरण्याची प्रेरणा मिळते; म्हणून त्यावर खर्च करणे अनाठायी ठरत नाही.
त्यामुळेच सरकारने ज्याप्रमाणे सामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे, त्याचप्रमाणे अनीष्ट बाबी कांटेकोरपणे दूर करण्याचा प्रयत्न करत करत; कुंभ मेळ्यासारख्या प्रेरक प्रथा देखील जोपासल्या पाहिजेत.
हा समतोल आहे. वैयक्तिक जीवनात आणि सामाजीक जीवनात त्याला अत्यंत महत्व आहे. आपण सर्वांनी आणि सरकारने असा समतोल साधायचा प्रयत्न केला तर ते सर्वांच्या हिताचे ठरेल.
नि:पक्षपातीपणे पाहिले, तर सहज कळेल की; भारताकडे असा समतोल साधण्याची पूर्वपुण्याई नामस्मरणाच्या परंपरेच्या स्वरूपात उपलब्ध आहे! त्यामुळेच कुंभ मेळ्यामध्ये सेवा करण्यासाठी हजारो स्वयंसेवक आणि दान देण्यासाठी हजारो दाते पुढे येतात!
पण एकंदरीत पाहता, सरकारने देखील नामस्मरणाचे महत्व ओळखून त्याचा अंगीकार आणि प्रसार केला, तर त्यातून; सर्वांच्याच उन्नतीला आवश्यक असा समतोल साधण्यासाठी; अनेक नवनवीन धोरणे, कल्पना आणि योजना सुचतील आणि त्या अंमलात आणण्यासाठी आवश्यक ती इच्छाशक्ती आणि क्रियाशक्तीही प्राप्त होईल; हे सत्ताधाऱ्यांच्या, शासनकर्त्यांच्या आणि सर्व क्षेत्रांतील नेत्यांच्या व उच्चपदस्थांच्या लक्षात येत आहे!