Aug22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 22nd August 2015
जीवनातील चैतन्य आणि गोडवा: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: सध्या आपण पाहतो, की कुंभ मेळ्यामध्ये तेथील लाखो लोकांचे आयुष्य; जंतुसंसर्ग, तज्जन्य साथी, अपघात, दहशतवादी हल्ले, गुन्हे, विकृती, दंगली; इत्यादींच्या सावटाखाली असते! त्यामुळे व्याधीग्रस्त, अपंग, परावलंबी आणि गोरगरीबांना घरच्या घरी; आणि सहज शक्य होईल असा नामस्मरणाचा मार्ग मला महत्वाचा वाटू लागला आहे. त्याबद्दल आणखी थोडे सांगा ना!
शिक्षक: कुंभ मेळ्याप्रमाणेच इतरही यात्रांमध्येही; उदाहरणार्थ; केदारनाथ, बद्रीनाथ, मानसरोवर,वैष्णोदेवी इत्यादींमध्येही; उपरोक्त धोके आणि अडचणी असतातच. पण त्या धोक्यांना न जुमानता, ह्या यात्रांना लोक जातातच. याशिवाय; गावोगावी असलेल्या ग्रामदैवतांच्या जत्रांना देखील लाखोंच्या संख्येने लोक जातातच! आपल्या पूर्वजांनी “एकत्र जमणे” ह्या मूलभूत प्रवृत्तीला विधायक चिंतनाकडे, आत्मज्ञानाकडे म्हणजेच अंतीम सत्याच्या व अमरत्वाच्या अनुभवाकडे वळवले आहे. किंबहुना वेगवेगळ्या धर्मांचे तत्वचिंतन, नीतिशास्त्र, रोजचे विधी, सण, उत्सव, व्रते इत्यादी सर्व बाबींचा मूळ उद्देश; सत्याचा व अमरत्वाचा अनुभव हाच आहे.
परंतु आपल्यामध्ये; जडत्वाकडे झुकण्याची; बळकट अशी सहजप्रवृत्ती आहे. त्या सहजप्रवृत्तीनुसार; कालांतराने धर्माच्या बाह्यस्वरूपाला आणि कर्मकांडाला जास्त महत्व आले. बाह्यअवडंबर फोफावले आणि धर्माचा मूळ उद्देश बाजूला पडू लागला. मनुष्य जीवनातील चैतन्य आणि गोडवा; आणि जिव्हाळा व सहकार्य ऱ्हास पावू लागले. जीवनाचा आधार ढासळू लागला. बेदिली, संशय, अविश्वास, कटुता, संकुचितपणा वाढू लागले. संकुचितपणा आणि अचेतनपणामुळे वैयक्तिक आणि सामाजिक दुरवस्था येत गेली आणि दुरवस्थेच्या कोलाहलामध्ये आपल्याला अंतरीच्या सच्चिदानंदमय चैतन्याची साद ऐकू येणे कमी झाले. त्यामुळे आपण नामस्मरणाच्या चैतन्यसाधनेपासून बराच काळ आणि पुष्कळ प्रमाणात वंचित राहिलो आणि त्यामुळे अधिकाधिक संकुचित आणि अचेतन बनत गेलो.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, नामदेव, तुलसीदास, मीराबाई, कबीर, एकनाथ, तुकाराम, रामदास, गोंदवलेकर महाराज अशा अनेक महान संतांना ही बाब प्रकर्षाने जाणवली. त्यामुळेच सर्व संतांनी; व्यक्ती आणि समष्टी मधील आंतरिक चैतन्याचा अनुभव घेण्याचे आणि सर्वांना सहज शक्य असे नामस्मरण हे साधन प्रसृत केले. सर्वांना; अगदी व्याधीग्रस्त, अपंग, परावलंबी आणि गोरगरीबांना देखील घरच्या घरी; जमेल असे नामस्मरण त्यांनी लोकांमध्ये प्रचलित केले, लोकप्रिय केले आणि रुजवले.
पण; अखंड नामस्मरण करणे ही सोपी गोष्ट नाही, आणि अशी गोडी निर्माण होण्यासाठी रोजचे विधी, सण, उत्सव, व्रते इत्यादी सर्व बाबींना महत्व आहे, हे माहीत असल्यामुळे आणि त्यांनी या बाबींचा तिरस्कार वा द्वेष केला नाही.