Jan11
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Monday, 11th January 2016
नामस्मरण आणि गांजा: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये पुष्कळ गांजा ओढला जातो, त्याबद्दल तुमचे काय मत आहे?
शिक्षक: गांजा असो वा अन्य मादक पदार्थ; त्यांच्याबद्दल; आपल्या मनात एक प्रकारची दहशत असते. तसेच; तिटकाराही असतो. पण साधूंच्या बद्दल; आदरयुक्त दबदबा आणि एक प्रकारचे कुतुहूलमिश्रित गूढ आपल्या मनात असल्यामुळे आपण त्यांच्याबद्दल फटकळपणे बोलत नाही आणि त्यांच्याविरोधी टोकाची भूमिका घेत नाही.
पण सर्वच मादक पदार्थ सारखेच नसतात. काही मादक पदार्थ मन भडकवू शकतात आणि त्यामुळे हिंसक गुन्हे घडू शकतात. पण काही मादक पदार्थ मनाची खळबळ, अशांती, अस्वस्थता, उन्माद वगैरे कमी करतात. असे म्हणतात की; काही मादक पदार्थामुळे लैंगिक वासना दबली जाते व वीर्यस्खलन वा शीघ्रपतन होत नाही. अध्यात्मिक प्रगतीसाठी वीर्यस्खलन होऊ न देणे महत्वाचे आहे असे काहीजण मानत असल्यामुळे लैंगिक वासना दाबून अध्यात्मिक प्रगती साधता यावी म्हणून ते मादक पदार्थांचे सेवन करत असू शकतात! त्यामुळे; गांजा ओढणे हे सर्व सामान्यांच्या कसोटीला उतरत नसले तरी तो गंभीर गुन्हा मानला जात नसावा.
विद्यार्थी: पण हे योग्य आहे?
शिक्षक: आपण व्यक्तिगत जीवनात कसे वागावे, काय खावे-प्यावे; आपला दिनक्रम कसा असावा; ह्याबद्दल जबरदस्ती वा सक्ती असावी का? कुणी ब्रह्मचारी असावे की गृहस्थाश्रमी ह्याचे स्वातंत्र्य ज्याचे त्याला हवे की नको? कुणी कोणते कपडे घालावे हे कुणी ठरवायचे?
त्यामुळे मला वाटते; इतरांना नावे ठेवण्यापेक्षा; आपले आचरण तपासून पाहावे. काळजीपूर्वक तपासल्यानंतर; आपले आचरण आपल्या स्वत:ला थोडे जरी खुपत किंवा सलत असले; किंवा लोकांना हानिकारक होत असले, तर ते प्रयत्नपूर्वक सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी नामस्मरण हाच उत्तम उपाय आहे असेच सर्व संतांचे सांगणे आहे.
विद्यार्थी: इतरांना नावे ठेवण्यापेक्षा; स्वत:कडे त्रयस्थ दृष्टीने पाहणे फार महत्वाचे आहे, कठीण आहे! तसेच; स्वत:मधले दोष दूर व्हावे असे वाटणे आहे, देखील कठीण आहे! नामस्मरणाने जर हे शक्य होत असेल असेल तर मी जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करीन.
शिक्षक: हा संकल्प सर्वश्रेष्ठ पण तो तेवढाच कठीण देखील आहे. कारण; आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे अनुभवतो, ते सारे आपल्या संकुचित आणि सदोष नजरेतून पाहत असल्यामुळे; आपल्याला नेहमीच नामस्मरणापासून विचलित करू शकते! म्हणजे; नामस्मरणाच्या आड आपले आपणच येत असतो! पण तरीही नाम, गुरु, ईश्वर म्हणजेच आपला अंतरात्मा; आपल्याकडून नामस्मरण करून घेतो!