May17
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 17th May 2016
स्वत:ला सुधारणे म्हणजे काय? डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्रीराम समर्थ!
स्वत:ला सुधारणे म्हणजे काय?
सद्गुरु श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, “जग सुधारायच्या नादी लागू नका; स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच !”
“जग सुधारायच्या नादी लागू नका”; म्हणजे जगाबद्दल बेपर्वा, बेफिकीर राहा असे नव्हे. उलट जग सुधारणे अत्यंत महत्वाचे आहे! पण आपण जग सुधारणे म्हणजे “जे” समजतो ते नाही आणि “जसे” समजतो तसेही संत समजत नाहीत!
आपण स्वत: उथळ आणि स्थूल असल्यामुळे जग सुधारायची आपली कल्पनाही उथळ, स्थूल आणि भ्रामक असते. जग सुधारणे म्हणजे जगाने आपले म्हणणे मान्य करणे नव्हे! जग सुधारणे म्हणजे जग आत्मज्ञानी होणे!
“स्वतःला सुधारा” याचा अर्थ काय?
स्वत:ला सुधारणे म्हणजे नेमके काय? ते कसे शक्य होईल? सुधारणे म्हणजे दोष काढणे म्हणावे तर आपल्यातले हजारो दोष आपल्याला दिसत देखील नाहीत आणि दिसले तर त्यांचे मूळ उपटून काढू म्हणता काढता येत नाही!
स्वत:ला सुधारणे म्हणजे अंतर्मुख होणे आणि आत्मज्ञानी होणे! आत्मज्ञानाचा मार्ग नामस्मरण!
“की त्या मानाने जग सुधारेलच” याचा अर्थ काय?
आपण आणि जग तत्वत: भिन्न नसल्यामुळे जगाला सुधारणे आणि स्वत:ला सुधारणे ह्या दोन्ही बाबी भिन्न भासल्या तरी वास्तविक भिन्न नाहीत! जग खऱ्या अर्थाने सुधारायचा मार्ग स्वत:च्या अंतरंगातून होणाऱ्या अखंड नामस्मरणातूनच जातो!
“आपण सुधारलो नाही, तर मग जग सुधारले नाहीच!” म्हणजे काय?
आपण आत्मज्ञानी नसताना भ्रमात असतो. त्यामुळे आपल्याला जग बिघडले (आपले न ऐकल्यामुळे) किंवा सुधारले (आपले ऐकल्यामुळे) असे वाटले तरी तो भ्रमच असतो! त्यामुळे जग बिघडले किंवा सुधारले असे म्हणणे पूर्णत: भ्रामक असते! म्हणूनच आपण सुधारलो नाही तर जग सुधारले नाहीच!
तात्पर्य:
स्वत:ला सुधारणे म्हणजे जमेल तसे आणि जमेल तितके नामस्मरण करीत राहणे!