Jun07
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 7th June 2016
सहिष्णुता: डॉ. श्रीनिवास कशाळीकर१. अंतर्बाह्य ईश्वर असताना त्याचा जणू पूर्ण विसर पडणे व त्याविषयी टिंगल टवाळीची भावना असणे आणि वासनाविवशतेचे अर्थात हीन स्वार्थाचे उद्दंड आणि बेभान समर्थन करणे (सहिष्णुता?)
२. वासना आणि ध्येय यांच्यात संघर्ष होऊन सारखी ओढाताण होणे अन वासनेमध्ये पुन्हा पुन्हा नाईलाजाने ओढले जाणे व वाहात जाणे व आपल्या आतल्या आणि बाह्य जगातील वासनेविषयी चीड येणे (असहिष्णुता) आणि कधी ह्या संघर्षामध्ये तीव्र खिन्नता येणे
३. ध्येयावरची पकड भक्कम होता होता वासनेची पकड ढिली होत जाणे आणि स्वत: आणि इतरांच्या वासनेविषयी असलेली चीड हळु हळु कमी होत जाणे व त्याचबरोबर ध्येयाविषयी अस्वस्थता,आतुरता व तळमळ निर्माण होणे
४. कालांतराने; ध्येयसिद्धीची खात्री झाली की अंतर्बाह्य वासनांचा भपका, बडेजाव, प्रभाव, बाऊ वा दबाव वाटेनासा होणे
५. अंतर्बाह्य पसरलेल्या वासनेचे पर्यवसान अखेर; त्याच एकमेव ध्येयात वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आणि वेगवेगळ्या काळानुसार पण निश्चीतपणे होते याची जाणीव ठळक होऊन; ध्येयाचा आग्रह/हेका/हट्ट आणि वासनेचा तिरस्कार व तिटकारा (ताप उतरल्यावर घाम निघून जावा तसे) हळु हळु निघून जाणे (सहिष्णुता!)
६. आतील आणि बाहेरील वासनांचा प्रभाव कमी झाल्यामुळे एकाच वेळी अंतर्बाह्य परिवर्तनाची विजयी अनुभूती येऊ लागणे आणि अंतर्बाह्य आघात विफल होऊ लागल्यामुळे शाश्वत समाधान आणि सार्थकता आवाक्यात येऊ लागणे
नामधारकाच्या आयुष्यातील अनुभवांचा हा सर्वसाधारण व ढोबळ मानाने आलेख आहे.
श्रीराम समर्थ!