Jun19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 19th June 2016
आपल्याला हव्या त्या गोष्टी: डॉ.श्रीनिवास कशाळीकर सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, “आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून,असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय.”
सुरुवातीला हे मला पटत नसे!
कारण?
जगामध्ये व आपल्या जीवनात काय व कसे असावे याबाबतच्या, अर्थात हवे-नको पणाच्या कल्पना, वासना आणि ओढ! म्हणजेच आत खोलवर लपून बसलेल्या अहंकाराचा पगडा!
पण जगामध्ये असो, वां वैयक्तिक जीवनात: आपल्याला हव्या त्या गोष्टी घडल्याने वा मिळाल्याने मनाला जेव्हां टोचणी लागल्याचा अनुभव अनेकदा आला आणि आपल्याला हव्याश्या वाटणाऱ्या अनेक बाबी न घडल्याने वा न मिळाल्याचे नंतर जेव्हा “हायसे” वाटल्याचा अर्थात समाधान झाल्याचा अनुभव जेव्हा अनेकदा आला, तेव्हा महाराजांचे हे बोल अक्षरश: पटले आणि मनात ठसले.
जगामध्ये असो, वा वैयक्तिक जीवनात: आपल्याला हव्या त्या गोष्टींसाठी स्वत:ला वा इतरांना पीडा देणे, किंवा त्या न मिळाल्याने मन मारून हताश होणे, ह्यातील तणावाच्या ओझ्याचे दुष्टचक्र कळू लागले!
ह्या दोन्हींना उत्तम पर्याय म्हणजे अश्या प्रत्येक प्रसंगी मनात असो वा नसो, नामस्मरण करणे हे जसे जसे लक्षात येत गेले तसे तसे, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी ईश्वरी सत्तेचे नि:पक्षपाती आणि अचूक नियंत्रण ध्यानात येऊ लागले! पर्यायाने नामस्मरण वाढत गेले आणि डोक्यावरचे मोठ्ठे ओझे कमी कमी होत गेले!
असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय ह्याचा अनुभव येऊ लागला!
श्रीराम समर्थ!