Jun19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 19th June 2016
देवाची (खरी) कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात “देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देतो”.
आम्हाला तर याच्या उलट वाटत असते! गडगंज पैसा म्हणजे देवाची कृपा असेच आम्हाला वाटत असते! हो की नाही?
मग खरं काय? सद्गुरू की आपण?
उत्तर सोपं आहे!
आपल्या मर्यादित, अपरिपक्व आणि पक्षपाती मनाचा भ्रम म्हणजे जास्त (अमर्याद) पैशांनी आपण सर्वोच्च सुख मिळवू शकतो! अर्थात आपल्या दृष्टीने तीच देवाची कृपा!
पण सद्गुरूंच्या अनंत, परिपक्व आणि नि:पक्षपाती सर्वज्ञतेचा अभिप्राय असा की “जास्त पैसा” मिळाला की आपण भरकटू शकतो! आपल्या आकांक्षा वाढतात, वासना वाढतात, इर्षा वाढते, काळजी वाढते, वखवख वाढते! असमाधान वाढते! ह्या सर्व बाबी समाधानाच्या आडच येतात! त्या नियंत्रणात ठेवणे ही अत्यंत कठीण आणि कसोटीचीच बाब नाही का? उलट पोटापुरता पैसा मिळाला तर अशी कसोटी नसते!
म्हणूनच सद्गुरू म्हणतात तेच खरे आहे! पोटापुरता पैसा मिळणाऱ्या आपल्यातल्या बहुसंख्यांवर देवाची कृपा आहे!
श्रीराम समर्थ!