Jun20
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Monday, 20th June 2016
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, "वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका, नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका."
वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका असे; सद्गुरू का म्हणतात?
कारण नामस्मरण चालू असले तरी, आपले शरीर, मन आणि परिस्थिती सतत आणि वेगाने बदलत असते. आपल्याला काय होते आहे आणि काय हवे आहे हे कळत नाही! एवढेच नव्हे तर आपल्याला काही कळत नाही हे देखील कळत नाही! बदल नको म्हणून नाहीसा होत नाही आणि बदल हवा म्हणून हवा तो बदल घडतोच असे नाही! बरं हवा तो बदल घडला, तरी पुन्हा तो नकोसा होतो आणि पुन्हा आपण अस्वस्थ ते अस्वस्थच राहतो! अश्या वेळी “संकुचित स्वार्थ न जपणारे नामच” प्रथम सुटण्याचा आणि विस्मरणाच्या गर्तेत जाणाचा संभव असतो! अश्या वेळी आपल्याला गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दिलेला कृपाळू हात म्हणजे सद्गुरूंचे हे सांगणे आहे!
“नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो” म्हणजे काय?
कल्याण याचा अर्थ; संकुचित आणि भ्रामक अस्वस्थतेतून उदात्त आणि शाश्वत स्वस्थतेकडे, समाधानाकडे जाणे आणि अश्या शाश्वत स्वस्थतेला पूरक असे कार्य; जीवनाच्या ज्या क्षेत्रात (शिक्षण, आरोग्य, राजकारण, संरक्षण, समाजकारण, व्यापार, उद्योग, चित्रकला, संगीत, नाटक, सिनेमा इत्यादी) आपण वावरत असू त्या क्षेत्रात आपल्याकडून घडणे!
श्रीराम समर्थ!