Jul05

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 5th July 2016
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद: डॉ. श्रीनिवास कशाळीकर विद्यार्थी: मेजवानी अन्नदान आणि प्रसाद यात काय फरक आहे?
शिक्षक: बहुतेक वेळा; मेजवानी देणे आणि घेणे यामध्ये एकमेकांना भेटणे, थट्टा मस्करी करणे, मजा लुटणे आणि श्रीमंती, मोठेपणा, भपका, झगमगाट यांचे प्रदर्शन असते. कुणाचा अहंगंड पोसला जातो, तर कुणाचा न्यूनगंड भडकतो. बऱ्याचदा मेजवानीमध्ये उत्तेजना असते, कैफ असतो, धुंदी असते आणि नंतर रितेपणा असतो, खिन्नता असते किंवा बेगडी आणि अतृप्त मिजास असते.
अन्नदान म्हणजे भुकेलेल्यांची भूक भागवणे. बहुतेकवेळा असहाय्य आणि गरजू लोकांच्या कळवळ्यापोटी आणि सहृदयतेणे जेव्हां जेवण किंवा शिधा वाटप होते, तेव्हां त्याला आपण अन्नदान म्हणतो. यामध्ये देणाऱ्याची सहानुभूती आणि धेणाऱ्याची कृतज्ञता असते.
प्रसाद, किंवा महाप्रसाद म्हणजे आशीर्वाद आणि कृपेने परिपूर्ण असे, अनु. खाद्यपदार्थ किंवा अन्न. देवाला किंवा आपल्या सद्गुरुना शुद्ध अंत:करणाने खाद्यपदार्थांचा किवा शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून, त्यांची अनुज्ञा घेऊन आणि त्यांचा कृपाशीर्वाद घेऊन जे परत मिळते त्याला आपण अनु. प्रसाद किंवा महाप्रसाद म्हणतो.
प्रसाद किंवा महाप्रसाद वाढणारे आणि ग्रहण करणारे सर्वच जण ईश्वराप्रती किंवा आपल्या सद्गुरुप्रती कृतज्ञ असतात आणि कृतार्थ असतात! यातून परस्परांच्या कल्याणाची सद्वासना, सद्भावना, सद्विचार, आणि सत्संकल्प यांचे पोषण होऊन सर्वांचे उत्थान अधिक जोमाने गतिमान होते.
प्रसादासाठी तन, मन वा धन अर्पून आपापल्या परीने सेवा करण्यातील मर्म असे अत्यंत उदात्त आहे!