Jul15

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 15th July 2016
नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकररस्ते, पूल, रेल्वे, वीज, दूरध्वनी, दूरदर्शन, इंटरनेट इत्यादी सुविधा ह्या आर्थिक पायाभूत सुविधा आहेत. एकंदर विकासात त्यांना महत्वाचे स्थान आहेच. त्यामुळे त्या अत्यावश्यक आहेत.
पण सर्वांगीण आरोग्यच नसेल तर ह्या सुविधांना अर्थ उरत नाही. त्या निरुपयोगी ठरतात. किंबहुना घातक देखील ठरू शकतात (कारण त्यांचा उपयोग रोग वाढण्यासाठी आणि पसरण्यासाठी होतो). त्यामुळे सर्वांगीण (सम्यक) आरोग्य जोपासणाऱ्या; सम्यक शिक्षण संस्था आणि सम्यक आरोग्य संस्था (सामाजिक पायाभूत सुविधा) अधिक अत्यावश्यक आहेत.
पण सुयोग्य आर्थिक आणि सामाजिक सुविधा निर्माण करण्यासाठी सम्यक दृष्टीकोन आणि त्या अनुरोधाने कार्य करणारी माणसे घडवणारी अशी पायाभूत सुविधा अत्याधिक अत्यावश्यक आहे! अश्या सुविधेच्या अभावी आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांची दिशा आणि दशा चुकते आणि दुरवस्था अन्य विविध मार्गांनी समाजात शिरकाव करते आणि समाज उध्वस्त करते. जगातील अनेक अप्रगत आणि तथाकथित प्रगत देशात देखील आज हे घडत आहे. अशी काही पायाभूत सुविधा आहे का?
होय! अशी एक पायाभूत सुविधा आहे! पूर्णपणे बिनखर्चाची, कुणाचेही अंत:करण आणि आणि अस्मिता न दुखावणारी आणि सर्वांनाच सहज शक्य अशी ही सुविधा आहे. ह्या सुविधेद्वारे सद्विचार, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प आणि विश्वकल्याणकारी आणि सतत विकसित होणारी सत्कार्ये अविरतपणे घडू लागतात. प्रत्येक व्यक्ती समाधानी आणि कृतार्थ होऊ लागते. अशी अत्याधिक अत्यावश्यक पायाभूत सुविधा म्हणजे नामस्मरण!