Jul31
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 31st July 2016
न्याय आणि नामस्मरण, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास कशाळीकर कोणत्याही बाबीवरील आपली प्रतिक्रिया काय आणि का होते?
आत्मज्ञानाच्या पूर्ण अभावातून आपण त्या बाबीला वाईट आणि बरी, योग्य किंवा अयोग्य, न्याय्य किंवा अन्याय्य, उच्च किंवा नीच ही सर्व विशेषणे आपल्या मर्यादित बुद्धीनुसार आणि पूर्वग्रहानुसार लावतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. त्यातून जी प्रतिक्रिया होते, ती आपल्याला आणि समाजाला आत्मज्ञानापासून दूर नेणारीच असते!
सत्ताकेंद्रांमधील व्यक्तींच्या अश्या प्रतिक्रियेतून घेतले जाणारे महत्वाचे निर्णय, कायदे, नियम, संकेत आणि विशेषत:न्यायदान यांच्यामुळे व्यक्ती आणि समाज मोठ्या प्रमाणात आत्मज्ञानापासून म्हणजेच आंतरिक एकात्मतेकडून परावृत्त होतात. ह्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात बेदिली वाढते. द्वेष वाढतो. वैर वाढते.
नामस्मरणाने आपण नामाच्या (सच्चिदानंदस्वरूप अंतरात्म्याच्या, ईश्वराच्या किंवा गुरुच्या) अधिकाधिक निकट जाऊ लागतो आणि ह्या कल्याणकारी प्रक्रियेमुळे प्रत्येक अणुरेणुच्या मागे आणि घटनेच्या मागे ईश्वरेच्छा आणि ईश्वरी सत्ता असते हे हळूहळू आपल्या लक्षात येते. हे लक्षात आल्यामुळे आणि येत असतांनाच; आपल्या मनात मानवी पूर्वग्रहविरहित व आत्मज्ञानाकाडे नेणारी, आणतारिक एकात्मता वाढवणारी आणि आंतरिक समाधान वाढवणारी प्रतिक्रिया उमटते आणि तशीच कृतीही घडते.
आपल्याकडून होणाऱ्या नामस्मरणामुळे आपल्या मनातील प्रतिक्रियांचे असे जे उत्थान होते त्याचा परिणाम इतरांच्या मनावर आणि कृतीवर देखील होतो आणि परिणामत: समाजातील एकी व बंधुता वाढू लागते.
अश्या तऱ्हेने; समाजात; आणि विशेषत: सर्व प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरण वाढते, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात व्यक्ती आणि समाजामधील सर्व स्तरांवरील क्रिया आणि प्रतिक्रिया अधिकाधिक पूर्वग्रहरहित (न्यायपूर्ण) आणि म्हणून आत्मज्ञानाकडे नेणाऱ्या म्हणजेच शाश्वत समाधानाकडे नेणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने कल्याणकारक होतात आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ लागतो.