Aug10
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 10th August 2016
भक्ती आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकरभक्ती म्हणजे अस्सल आणि सर्वोत्तम आरोग्य! जीवाच्या पूर्णतेची, उत्कट, निस्वार्थी विश्वकल्याणकारी आणि अजरामर अवस्था म्हणजे भक्ती. वैयाक्तिक, मर्यादित आणि संकुचित भ्रम गळून जाण्याची अवस्था म्हणजे भक्ती. भेदभाव, पक्षपातीपणा, पूर्वग्रह, द्वेष, सूडबुद्धी, भीती, काळजी, हाव, अपेक्षा विरघळून जाण्याची अवस्था म्हणजे भक्ती. प्रतिक्षणी सद्भावना संप्रेरित करणारी जीवाची अवस्था म्हणजे भक्ती. भक्ताची निव्वळ उपस्थिती देखील आपल्याला सच्चिदानंदाकडे खेचून घेते.
म्हणूनच परमात्मस्वरूप सद्गुरुंच्या परम कृपेने आपण सर्वजण उथळ आणि संकुचित अस्तित्वातून प्रगत होत, भक्तिमार्गाला लागतो! सद्गुरुकृपेनेच जीवनात घडलेली आणि घडत जाणारी प्रत्येक बाब शरणागतीमध्ये आणि भक्तीमध्ये परिणत होऊ लागते. अश्या तऱ्हेने हळूहळू नामात रंगण्याचा म्हणजेच भक्तीचा अल्पसा देखील अनुभव येणे ही सद्गुरूंची परम कृपाच होय!
म्हणूनच “तुम्ही नुसते नाम घ्या; बाकीचे सर्व मी करतो” हे सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांचे वाक्य सतत आठवत राहून, जमेल तेवढे आणि जमेल तसे नामस्मरण चिकाटीने करीत राहणे आणि आपल्याला समजलेले व्यक्त करत जाणे ह्यालाच आपण आपल्या जीवनात सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे!
श्रीराम समर्थ!