Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
५. स्मरण ही कृती आहे : डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “स्मरण ही कृती आहे. विस्मरण ही वृत्ति आहे.”
कृती आणि वृत्ति यात काय फरक आहे?
वृत्ति ही अनवधानाने आपल्या नकळत आतून उसळत असते. कृती ही जाणूनबुजून कळून सवरून केलेली असते. वृत्तिचा ओघ “खाली” असतो. कृतीची ओढ “वर” असते. वृत्तीचा प्रवाह उलट फिरवणारी ती कृती!
रोजच्या जीवनात डोकावले तर दोन्हीतला फरक आणखी स्पष्ट होऊ शकतो.
आपले आई वडील, आपली पत्नी, आपला पती, आपली मुले, आपली नातवंडे, आपले मित्र-मैत्रिणी, आपले शिक्षक, आपले डॉक्टर, आपले विद्यार्थी; सर्व जण स्वस्थ असावी असे आपल्याला वाटते ना? म्हणजेच आपल्या अवती-भोवती प्रसन्न वातावरण असावे असे वाटते ना? पण आपली शारीरिक क्षमता, आपली आर्थिक कुवत, आपली सामाजिक प्रतिष्ठा, आपले राजकीय वजन इत्यादी कमी कमी होत चालल्या की, आपण आता निकामी झालो असे वाटू लागते. ह्या जांणीवेने आपण असहाय्य आणि खिन्न होत जातो! आपले आप्त आणि स्वकीय जर दूर राहात असले तर आपल्याला हे अधिकच जाणवते आणि आपले स्वास्थ्य दूर जाते! प्रसन्नता दूर जाते! नकळत नामस्मरण विसरले जाते! हे नामविस्मरण ही वृत्ति!
आपले आई-वडील, आपले मित्र-मैत्रिणी, आपली पत्नी, आपला पती, आपली मुले, आपली नातवंडे, आपले शिक्षक, आपले डॉक्टर, आपले विद्यार्थी; थोडक्यात सर्व जण स्वस्थ व्हावे यासाठी अगदी असहाय्य अवस्थेत देखील वृत्ति पालटण्याचे व उलट फिरवणारी कृती म्हणजे नामस्मरण!
हे साधन सहजा सहजी पटत आणि रुचत नाही. कारण, आपण इतरांच्यासाठी काही करू शकतो हा सुप्तपणे मनात असलेला कर्तेपणाचा भाव! हा असला मोठेपणा; नामस्मरण करून गोंजारला जात नाही! तसेच तो मिरवता येत नाही. कारण, नामस्मरण करीत असताना आपण इतरांच्यासाठी सोडाच, स्वत:साठी देखील काही करत असल्याचे स्वत:लाही सहजासहजी जाणवत नाही आणि इतरांनाही दाखवता येत नाही!
पण नामस्मरणाच्या कृतिनेच आपली वृत्ति पालटू लागते! ह्या कृतीनेच आपला उर्ध्वगामी प्रवास सुरु होतो! ह्या कृतीनेच आपल्या सर्वांच्या हृदयातील ईश्वर प्रगट होण्याचा म्हणजेच जीवनामध्ये खऱ्या स्वास्थ्याचा वसंत अंतर्बाह्य फुलण्याचा मार्ग मोकळा होतो!