Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
९. तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "जगात कुठलीही गोष्ट अती केली की माती होते पण नामस्मरण ही ऐकमेव गोष्ट आहे की ती अती केले की माती नाही तर जीवनाचे सोने होते. नामामुळे परमेश्वराला तुमच्या बरोबर रहावे लागते"
मला कळलेला याचा अर्थ असा की नाम म्हणजेच ब्रह्म आणि नाम म्हणजेच भगवंत आहे. नाम आपल्या अस्तित्वाचा गाभाच आहे. त्यामुळे, नामस्मरणाने आपण आपल्या आत, आपल्या अस्तित्वाच्या गाभ्याकडे, जिथे परमेश्वराची म्हणजेच सद्गुरूंची वस्ती असते तिथे जातो! त्यामुळे नामस्मरण अती झाले तर त्यामुळे काहीही बिघडण्याचा (माती होण्याचा) प्रश्नच येत नाही! अती नामस्मरणाने फार तर आपण परमेश्वराच्या म्हणजेच सद्गुरुंच्या म्हणजेच स्वत:च्या सच्चिदानंदस्वरूपाच्या (कालातीत, अजरामर चैतन्याच्या आणि शाश्वत समाधानाच्या) अधिक निकट पोचू! तद्रूप होऊ; नाही का? पण ही तर सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे! नामस्मरण हे अमृत आहे असे जे म्हणतात ते ह्याच कारणासाठी! अमृत म्हणजे मृत्युच्या पलिकडे नेणारे, अमर करणारे. हा अनुभव आपल्याच अस्तित्वाच्या गाभ्याचा असतो, म्हणून, ह्याला कोणी आत्मानुभूती, कोणी आत्मसाक्षात्कार. तर कोणी आत्मज्ञान म्हणतात. मर्त्य जीवनाच्या कोंडवाड्यातून वा तुरुंगातून सुटका होऊन अमर अस्तित्वाचे स्वातंत्र्य मिळते म्हणून कोणी ह्यालाच खरे स्वातंत्र्य, कोणी मोक्ष, तर कोणी मुक्ती म्हणतात. सगुण भक्ती करणारे भक्त ह्याच अनुभवाला भगवंताचे दर्शन म्हणत असल्यामुळे, ह्याच अलौकिक अनुभवाचे वर्णन; सद्गुरू, "परमेश्वराला तुमच्या जवळ राहावे लागते" असे करतात.
त्याचप्रमाणे, ह्या एका परीने अत्यंत आतल्या आणि अत्यंत खाजगी अश्या अनुभवातच आपले, आपल्या कुटुंबाचे आणि संपूर्ण विश्वाचेही शाश्वत कल्याण असते. कारण नाम घेणारी व्यक्ती, तिची इच्छा असो वा नसो, कधीही स्वत:चे संकुचित कल्याण साधू शकत नाही. म्हणून, असे सार्वत्रिक कल्याण नामस्मरणात असल्याने, ह्यालाच "जीवनाचे सोने होते" असे सद्गुरू म्हणतात! वाचन लेखनाने; नामस्मरण करण्याचा आपला निर्धार बळकट होऊ शकतो, पण केवळ तेवढा पुरत नाही! सद्गुरुंच्या सांगण्याचा प्रत्यक्ष अनुभव सतत नामस्मरण केल्यानेच येऊ शकतो!