Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
१३. प्रपंचात खरी विश्रांती डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “ सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे”.
आपल्या परीने कितीही मौजमजा केली किंवा आपल्या स्वत:च्या किंवा आईवडिलांच्या महत्त्वाकांक्षेनुसार अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण केले, तरी यश मिळो वा अपयश ते तात्कालिक आणि वरवरचे असल्याने आपले समाधान होत नाही! साहजिकच अश्या तऱ्हेने जेव्हा समाधान होत नाही, तेव्हा अस्वस्थता येते!
प्रथम अस्वस्थता, मग अभ्यास, मग शोध, मग नामाची ओळख, मग संशय, मग द्वंद्व, मग चिकित्सा, मग थोडे थोडे नामस्मरण, मग वासना आणि नाम यांच्यातली रस्सीखेच, वासनेमागून फरफट, बळजबरीचे नामस्मरण, हळु हळु नामाच्या महानतेची वाढती समज, मग नामस्मरणाचा सक्रीय प्रचार व प्रसार, मग उत्तेजना, मग वाढते नामस्मरण, मग अधिक उत्तेजना, मग अधिक अभ्यास आणि नामाचा अधिक उत्साहाने प्रसार, पण मधून मधून निराशा आणि उद्वेग, याशिवाय पुन्हा पुन्हा संशय, कधी कधी खिन्नता, मग अधिक नामस्मरण; अशा टप्प्या-टप्प्यानी; आपली प्रगती होते.
पुढे आपले सद्गुरू दिवसाचे १२-१३ तास नामस्मरण करण्यासाठी आपल्याला सक्षम आणि समर्थ बनवतात.
म्हणजेच; अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण; ह्या सर्वांना सामावणारे आणि सर्वांना आधारभूत असे नामकारण करण्यासाठी (नामस्मरण आणि त्याचा प्रसार करण्यासाठी) आपले सद्गुरू आपल्याला सक्षम आणि समर्थ बनवतात! म्हणजेच शाश्वत समाधानासाठी लायक बनवतात!
आपल्याला जेव्हां हे कळते, तेव्हां आपले सद्गुरू आपल्याला भेटणे आणि नामस्मरणाचा व पर्यायाने नामकारणाचा लाभ होणे याची किंमत आपल्याला थोडीफार कळू लागते आणि नामकारण करता येणे हे आपल्या जन्मोजन्मीचे भाग्य आहे असे आपल्या लक्षात येते!
विशेष हणजे ज्याला आपण विश्रांती समजत होतो तो केवळ आळस होता व म्हणूनच ती खरी विश्रांती नव्हती व खरी विश्रांती नामस्मरणातच आहे हे ध्यानी येते व सद्गुरुंबद्दलची कृतज्ञता शतपटीने वाढते!