Sep16
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 16th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर लेखांक १.
मान्यवर वाचक स्नेही! सादर प्रणाम!
ह्या पुस्तकात तुम्हाला, मूळ संस्कृत विष्णुसहस्रनाम स्तोत्र, त्यामधील विष्णुच्या एक हजार नावांचे मराठी अर्थ आणि त्या अर्थांमधून मला जाणवलेला आशय वाचायला मिळेल.
हा आशय वाचताना, तो स्वत:च्याच अंतर्यामी स्फुरला आहे असे जर तुम्हाला वाटले, तर त्यात काहीही वावगे नाही. कारण, ह्या शब्दांमधला आशय, वास्तविक शब्दातीत आहे. आपल्या सर्वांच्या; जाणीवेच्या आणि अस्तित्वाच्या मूलस्त्रोताशी एकजीव आहे. जाती, धर्म, राष्ट्रीयत्व, वंश, संस्कृती, व्यवसाय, लिंग, प्रवृत्ती, विचार, विकास, वय वगैरे विविध प्रकारच्या वर्गीकरणात बसणाऱ्या प्रत्येकाच्या मूलाधाराशी तो एकात्म आहे. म्हणूनच तो आपल्या सर्वांचाच आहे व राहील.
आपल्या सर्वांच्या अंतरंगीचे हे अमृत, ही आनंदसंजीवनी; संकुचितपणाकडून विशालत्वाकडे, धर्मवेडाकडून सहृदय उदारतेकडे, वैचारिक गुलामीतून सत्याच्या प्रचीतीकडे, दुबळेपणातून समर्थतेकडे आणि विपन्नावस्थेतून संपन्नतेकडे नेणारी विश्वकल्याणकारी संजीवनी आहे अशी खात्री होत राहिल्यामुळे; ही शब्दातीत आनंद संजीवनी काही प्रमाणात का असेना, शब्दबद्ध करण्याचे कठीण काम माझ्यासारख्या अति सामान्य व्यक्तीकडून पार पडले आहे ही लक्ष्मीनारायणाची म्हणजेच सद्गुरूंची कृपा.