Sep16
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 16th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर लेखांक ६
श्री गणेशाय नम:
संपूर्ण विश्वाचा आणि आपल्या जीवनाचा आणि प्रज्ञेचा देखील मूलाधार अशा ॐकाराचे सगुण स्वरूप म्हणजे गणेश. म्हणूनच सर्व कार्याप्रमाणे ह्या कार्याच्या आरंभी देखील श्री गणेशाला नमन असो.
श्री. वेदव्यासाय नम:
भगवान श्री वेदव्यास महर्षीनी महाभारतामध्ये भीष्माचार्य आणि युधिष्ठिर ह्यांच्या संवादाद्वारे विष्णूसहस्रनामस्तोत्र प्रगट केले आहे. ह्या स्तोत्राचा आशय म्हणजे सर्व तऱ्हेच्या भेदाभेदांच्या पलीकडील कालातीत सामर्थ्याचा महास्त्रोत आहे. वैयक्तिक आणि वैश्विक उत्कर्षाची ती महासंजीवनीच आहे.
वेदव्यास म्हणजे आपल्याच अंतरंगातील, पण एरवी आपल्याला सहजासहजी प्राप्त न होणारा असं दुष्प्राप्य आणि दुर्लभ असा सच्चिदानंदच.
म्हणून विष्णुसहस्रनामाचा अचूक आशय कळावा म्हणून श्री वेदव्यासाना प्रणाम असो.
यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात्
विमुच्यते नमस्तमै विष्णवे प्रभविष्णवे
ज्याच्या केवळ आठवणीने देखील जन्म आणि मृत्युच्या चक्रातून म्हणजे अज्ञ आणि परावलंबी अस्तित्वातून मुक्ती मिळते, तो विष्णू अंतर्बाह्य सर्व व्यापणारा सर्वव्यापी आहे. तो विचारातीत आहे. तो संप्रदायातीत आहे. त्या विश्वव्यापी श्री विष्णूला माझे (माझ्या मर्यादित अस्तित्वाचे) साष्टांग नमस्कार असोत.