Sep17
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 17th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर लेखांक ८.
प्रश्न २. किंवाप्येकं परायणम् ह्याचा आशय असा आहे की विश्वनियंत्रक अशी शक्ती ही कुणी व्यक्ती नाही. ती वस्तू नाही. ती एकादे स्थान नाही. ती वीज किंवा उष्णता यासारखी उर्जा नाही. ती अवकाश व काल देखील नाही. ती वासना, भावना, कल्पना, विचार, प्रेरणा, इच्छा इत्यादी काही नाही. ती एकादी निव्वळ मानसिक अवस्था देखील नाही. परंतु, ती “शब्दातीत शक्ती” आपल्या अंतर्यामी आणि खोलवर असल्याचे जसे अस्पष्टपणे जाणवते, तसेच ती संपूर्ण विश्वातील अणुरेणु व्यापून आहे असे देखील भासते. अंतर्यामी असल्यामुळे शरीराने “तिथे” पोचण्याचा प्रश्नच नाही. परंतु “जाणीवेने तिथे पोचण्यासाठी देखील ती अत्यंत दूर भासते.
वर्णन करण्यास अशक्य असल्यामुळे ह्या सद्गतीचे वर्णन आपापल्या परीने संकेताने केले जाते. आपण तिला जाणीवेची सद्गती म्हणू. ह्या सद्गतीलाच; परंधाम, ईश्वराचे चरण कमल, ईश्वरी साक्षात्कार, सद्गुरुभेट, मोक्ष, निर्वाण, मुक्ती म्हणतात. जाणीवेच्या ह्या सद्गतीमध्ये पूर्णत्व येत असल्या तिला शाश्वत समाधानाची किंवा सच्चिदानंदाची अनुभूती म्हणतात. ती जाणीवेच्या पलीकडे असलेली सर्वांच्या अस्तित्वाची आणि जाणीवेची सद्गती असल्यामुळे आणि ह्या सद्गतीमध्ये सुरक्षितता अनुभवाला येत असल्यामुळे तिला कालातीत आश्रयस्थान म्हणतात. तिचे स्वरूप धूसरपणे जाणवत असल्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो, की सर्वांचे “अंतीम गंतव्य” असे ते जडत्वहीन आणि म्हणूनच पवित्रतम असलेले असे “स्थान” कोणते?