Sep18
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 18th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर लेखांक ११.
प्रश्न ५.
को धर्म: सर्व धर्माणां भवत: परमो मत:
धर्म ह्याचा अर्थ सर्व दृश्य आणि अदृश्य अशा विश्वाला आधारभूत अशी व्यवस्था. तिचे अचूक ज्ञान आत्मसात होणे हे मनुष्य जीवनाला आधारभूत असून अशा ज्ञानाला अखिल मानव जातीचा आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचा सर्वश्रेष्ठ धर्म असे म्हणतात.
ह्या धर्माविषयी संभ्रम होऊ नये म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने महाराज युधिष्ठीर हा प्रश्न विचारतात. याअगोदर जे चार प्रश्न विचारले गेले आहेत, त्याना अनुरोधून पाहिले तर, अंतरीचा निर्गुण देव, म्हणजेच योग्य स्तुती आणि पूजेचे अचूक स्थान ह्या सर्वश्रेष्ठ धर्माच्या आचरणानेच प्राप्त हितात आणि आपले जीवन सर्वतोपरी कृतार्थ होत होत; सच्चिदानंद अनुभूतीमध्ये परिणत होते.
प्रश्न ६.
किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसार बंधनात?
याअगोदर विचारात घेतलेल्या धर्माचे एक उन्नत, अत्यावश्यक आणि अविभाज्य अंग म्हणजे स्मरण. ह्यालाच जप असेही म्हणतात.
सुरवातीला “जन्म-मृत्त्युचे बंधन” आणि “त्यातून मुक्ती” हे शब्दप्रयोग आणि ह्या कल्पना आपल्याला अनैसर्गिक (आणि काहीजणांना तर विकृत) वाटू शकतात. परंतु आपण जसे जसे; जीवनाच्या गाभ्याच्या नजीक पोचतो, तसे तसे हे शब्द प्रयोग आणि ह्या कल्पना समजू लागतात. त्यांच्यातील मर्म ध्यानात येऊ लागते. जन्म आणि मृत्युच्या अर्थात संसाराच्या बंधनातून मुक्ती म्हणजे आंतरिक सामाधानापासून पुन्हा पुन्हा फरफटत दूर जावे लागण्यापासून मुक्ती असते; ह्याची कल्पना येऊ लागते.
पण हे सारे नामस्मरणाच्या आचरणानेच अधिकाधिक स्पष्ट होऊ लागते!
पण म्हणूनच महाराज युधिष्ठीर आपल्या सर्वांच्या वतीने हा प्रश्न उपस्थित करीत असताना दिसत आहेत, की कोणत्या जपाच्या साह्याने जंतू म्हणजे मनुष्य प्राणी जन्म आणि मृत्यू ह्यांच्या; अर्थात संसाराच्या बंधनातून मुक्त होईल?