Sep18
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 18th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर लेखांक १२.
भीष्म उवाच
जगत्प्रभुं देवदेवन्तम पुरुषोत्तमम्
स्तुवन्नामसहस्रेण पुरुषसततोत्थित: -६.
भीष्माचार्य म्हणाले, “सर्व जगाचा (चराचर विश्वाचा) स्वामी, देवांचा देव (आपण देव म्हणून किंवा सर्वश्रेष्ठ म्हणून जी कल्पना करू शकतो त्या भ्रामक कल्पनेपलिकडे असलेला) आणि अनंत म्हणजे आपल्या जाणीवेतील सर्व मर्यादित आणि नश्वर विश्वाच्या अतीत असा पुरुषोत्तम आहे. अर्थपूर्ण अशा त्याच्या एक हजार नामांच्या आधारे त्याचे स्मरण (जप) आणि स्तुती करून आपण उद्धरले जातो. (आपल्या जडत्वातून आणि अज्ञानातून मुक्त आणि जागृत होत जातो).
तमेव चार्च्ययन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम्
ध्यायन्स्तुवन्नमस्यंश्च यजमानस्तमेवच – ७.
भीष्माचार्य मग म्हणाले, “आपल्या सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या ह्या अविनाशी सत्याला सगुण रूप देऊन त्या पुरुषाची भक्तिपूर्वक पूजा अर्चा करावी. त्याचे ध्यान करावे आणि त्याची स्तुती करावी. त्याला नमन करावे”.
ह्याचा मथितार्थ असा की, ह्या अविनाशी तत्वाबद्दल आपल्याला असलेली सुप्त ओढ, तिच्या विरुद्ध असणाऱ्या आपल्या वासनांमुळे दुबळी होते हे जाणून त्या सर्व वासना आणि आशा आकांक्षा; जाणीवपूर्वक आणि सतत त्या पुरुषाच्याकडे वळवायच्या. अशा तऱ्हेने; सर्वान्तर्यामी नियंत्रक प्रभुत्वाने वसणाऱ्या ह्या सत्ताधीशाचा ध्यास घ्यायचा, सर्व लक्ष त्याच्यावरच केंद्रित करायचे, त्याच्याबद्दलची आपली नितांत पण सुप्त आवड मनात घोळवून ती आवड व्यक्त आणि दृढ करणारी स्तुती करायची; आणि त्याच्यापासून दूर नेणारे आपले सर्व संकुचित अस्तित्व त्याच्या चरणावर संपूर्णपणे झोकून द्यायचे, त्याच्या पायावर लोळण घ्यायची!