World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : July 2016
Medical Articles
Jul31
न्याय आणि नामस्मरण, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास
न्याय आणि नामस्मरण, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

कोणत्याही बाबीवरील आपली प्रतिक्रिया काय आणि का होते?

आत्मज्ञानाच्या पूर्ण अभावातून आपण त्या बाबीला वाईट आणि बरी, योग्य किंवा अयोग्य, न्याय्य किंवा अन्याय्य, उच्च किंवा नीच ही सर्व विशेषणे आपल्या मर्यादित बुद्धीनुसार आणि पूर्वग्रहानुसार लावतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. त्यातून जी प्रतिक्रिया होते, ती आपल्याला आणि समाजाला आत्मज्ञानापासून दूर नेणारीच असते!

सत्ताकेंद्रांमधील व्यक्तींच्या अश्या प्रतिक्रियेतून घेतले जाणारे महत्वाचे निर्णय, कायदे, नियम, संकेत आणि विशेषत:न्यायदान यांच्यामुळे व्यक्ती आणि समाज मोठ्या प्रमाणात आत्मज्ञानापासून म्हणजेच आंतरिक एकात्मतेकडून परावृत्त होतात. ह्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात बेदिली वाढते. द्वेष वाढतो. वैर वाढते.

नामस्मरणाने आपण नामाच्या (सच्चिदानंदस्वरूप अंतरात्म्याच्या, ईश्वराच्या किंवा गुरुच्या) अधिकाधिक निकट जाऊ लागतो आणि ह्या कल्याणकारी प्रक्रियेमुळे प्रत्येक अणुरेणुच्या मागे आणि घटनेच्या मागे ईश्वरेच्छा आणि ईश्वरी सत्ता असते हे हळूहळू आपल्या लक्षात येते. हे लक्षात आल्यामुळे आणि येत असतांनाच; आपल्या मनात मानवी पूर्वग्रहविरहित व आत्मज्ञानाकाडे नेणारी, आणतारिक एकात्मता वाढवणारी आणि आंतरिक समाधान वाढवणारी प्रतिक्रिया उमटते आणि तशीच कृतीही घडते.

आपल्याकडून होणाऱ्या नामस्मरणामुळे आपल्या मनातील प्रतिक्रियांचे असे जे उत्थान होते त्याचा परिणाम इतरांच्या मनावर आणि कृतीवर देखील होतो आणि परिणामत: समाजातील एकी व बंधुता वाढू लागते.

अश्या तऱ्हेने; समाजात; आणि विशेषत: सर्व प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरण वाढते, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात व्यक्ती आणि समाजामधील सर्व स्तरांवरील क्रिया आणि प्रतिक्रिया अधिकाधिक पूर्वग्रहरहित (न्यायपूर्ण) आणि म्हणून आत्मज्ञानाकडे नेणाऱ्या म्हणजेच शाश्वत समाधानाकडे नेणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने कल्याणकारक होतात आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ लागतो.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4771)  |  User Rating
Rate It


Jul31
सहिष्णुता, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सहिष्णुता, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

ढोबळ मानाने पाहता, सहिष्णुतेच्या प्रवासाच्या चार पायऱ्या असतात.

अंतर्बाह्य ईश्वर असताना त्याचा पूर्ण विसर पडणे (त्यामुळे त्याविषयी टिंगल टवाळीची भावना असणे) आणि त्यामुळे, अंतर्बाह्य पसरलेल्या वासनाविवशतेला विरोध तर नाहीच पण तिचे (हीन स्वार्थाचे) उद्दंड आणि बेभान समर्थन करणे ही सकृद्दर्शनी सहिष्णुता वाटली तरी ती सहिष्णुता नसून स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरात्म्याशी केलेली घोर प्रतारणा असते. ही सहिष्णुतेच्या प्रवासाची पहिली पायरी.

वासना आणि ध्येय यांच्यात संघर्ष होऊन सारखी ओढाताण होणे अन वासनेमध्ये पुन्हा पुन्हा नाईलाजाने ओढले जाणे व वाहात जाणे व आपल्या आतल्या आणि बाह्य जगातील वासनेविषयी चीड येणे ही सकृद्दर्शनी असहिष्णुता वाटली तरी ती असहिष्णुता नसून, स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरात्म्याशी सहिष्णू बनण्याची प्रामाणिक धडपड असते. ही सहिष्णुतेच्या प्रवासाची दुसरी पायरी.

नामाची निष्ठा भक्कम होता होता नामाच्या ओढीने अस्वस्थता,आतुरता व तळमळ निर्माण होणे आणि अंतर्बाह्य व्यापणाऱ्या वासनाचे आघात आणि पकड ढिली होउन अंतर्बाह्य पसरलेल्या वासनेचे पर्यवसान वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आणि वेगवेगळ्या काळानुसार पण निश्चीतपणे नामाच्या ओढीत आणि गोडीत होते ह्या अंतर्बाह्य परिवर्तनाची विजयी अनुभूती, शाश्वत समाधान आणि सार्थकता याची जाणीव ठळक होऊन; नामाचा आग्रह, हेका, हट्ट आणि वासनेचा तिरस्कार व तिटकारा हळु हळु निघून जाणे ही सहिष्णुतेच्या प्रवासाची तिसरी पायरी.

आणि याच्या पलीकडे सहिष्णुतेच्या प्रवासाची चवथी पायरी असते. ह्या शब्दातीत पायरीवर संत असतात. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, त्याप्रमाणे “संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो”!

ह्या सहिष्णुतेचे महत्व असे की ती केवळ शाब्दिक सहिष्णुता नसून प्रत्यक्ष विश्वकल्याण साधणारी संजीवक अमृतौषधी असते!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4923)  |  User Rating
Rate It


Jul31
राम कर्ता, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
राम कर्ता, ताजे आकलन: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, “राम कर्ता म्हणेल तो सुखी, मी कर्ता म्हणेल तो दु:खी”.

या विश्वामध्ये आपण सर्वजण (मानव, प्राणी, वनस्पती, इतर सजीव आणि निर्जीव), विशिष्ट ऊर्जा, क्षमता, गुण आणि सृजनशीलता यानी परिपूर्ण असतो. पण आपल्याला याची यथार्थ जाणीव, कल्पना नसते.
एका टप्प्यावर आपल्यामध्ये वासना, भावना, विचार आणि दृष्टिकोन; प्रगट होऊ लागतात. अशा तऱ्हेने आपण वेगळे कुणीतरी असल्याचा भास आपल्याला होऊ लागतो. म्हणजेच आपल्यातला भ्रामक "मी" जागृत होतो; आणि आपण; वस्तू, पैसा, जोडीदार, घर, नोकरी; किंवा सत्ता, समाजकार्य, लोकसेवा वगैरे मध्ये गुंतून जातो. हे सर्व आपल्या अंतर्मनात आणि जागृत मनामध्ये चालू असते. अश्या तऱ्हेने आपल्या हातून बर्यार वाईट गोष्टी घडत जातात आणि त्यातून येणार्याय सुख दु:खातून आणि यश-अपयशातून आपले आणि संपूर्ण विश्वाचे स्वरूप घडत आणि बिघडत जाते!

अश्या तऱ्हेच्या भ्रामक मी पणातून आपण “मी कर्ता” असे म्हणतो आणि पराधीनतेतील संकुचित सुख-दु:खात सडत राहतो. ह्यालाच सद्गुरू, “मी कर्ता म्हणेल तो दु:खी” म्हणतात.

सद्गुरू म्हणजेच नाम आणि राम. तो काळ, अवकाश आणि आपल्या सर्व जाणीवांच्या अतीत आहे. त्याच्याच कृपेने आपल्याला नामाची संजीवनी प्राप्त होते आणि तोच आपले संकुचित शहाणपण, क्षुद्र गर्व, अनाठायी हट्ट, अवाजवी आग्रह आणि हीन अहंकार गळून पडू लागतात. त्याच्याच कृपेने “मी कर्ता” ह्या भ्रमातून घट्ट धरलेली इतर सर्व ध्येये बाजूला पडत जातात आणि त्याचीच म्हणजेच नामाचीच ओढ आणि गोडी वाढत जाते. त्याच्याच कृपेने तो म्हणजेच नाम आपल्या सर्वाच्या अन्तर्यामी असल्याचे कळू लागते आणि नामाच्या सच्चिदानंद स्वरूपाची आणि अमृतमयी सान्निध्याची प्रचीती येऊ लागते. जीवन कृतज्ञता आणि सार्थकता यानी भरून जाते.

ह्यालाच सद्गुरू, “राम कर्ता म्हणेल तो सुखी” असे म्हणतात.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4836)  |  User Rating
Rate It


Jul27
न्याय आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
न्याय आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

कोणतीही बाब पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपली प्रतिक्रिया काय आणि का होते? वाईट आणि बरी, योग्य किंवा अयोग्य, न्याय्य किंवा अन्याय्य, उच्च किंवा नीच ही सर्व विशेषणे आपण आपापल्या मर्यादित बुद्धीनुसार आणि पूर्वग्रहानुसार लावतो आणि त्यानुसार आपली मानसिक प्रतिक्रिया होते आणि आपल्या हातून कृती घडते.

पण अश्या प्रतिक्रियेमुळे महत्वाचे निर्णय, कायदे, नियम, संकेत आणि विशेषत:न्यायदान संकुचित आणि घातक बनतात.. ह्यामुळे समाजात बेदिली वाढते. द्वेष वाढतो. वैर वाढते. परिणामात: व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास रखडतो.

नामस्मरणाने आपण नामाच्या (सच्चिदानंदस्वरूप अंतरात्म्याच्या, ईश्वराच्या किंवा गुरुच्या) अधिकाधिक निकट जाऊ लागतो आणि ह्या कल्याणकारी प्रक्रियेमुळे हळूहळू आपल्या लक्षात येते की, प्रत्येक अणुरेणुच्या मागे आणि घटनेमागे ईश्वरेच्छा आणि ईश्वरी सत्ता असते. हे लक्षात आल्यामुळे आणि येत असतांनाच; आपल्या मनात ईश्वरी (मानवी पूर्वग्रहविरहित) इच्छेने आंतरिक समाधान वाढवणारी प्रतिक्रिया उमटते आणि आपल्याकडून समाधान वाढवणारी पूर्वग्रहविरहित आणि कल्याणकारी कृती घडते..

आपल्या नामस्मरणामुळे इतरांच्या मनामध्ये देखील ह्या प्रक्रिया घडतात आणि परिणामत: समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते.

समाजात; आणि विशेषत: सर्व प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरण वाढेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात समाजामधील सर्व स्तरांवरील क्रिया आणि प्रतिक्रिया अधिकाधिक पूर्वग्रहरहित (न्यायपूर्ण) आणि म्हणून कल्याणकारक होतात आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ लागतो.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4975)  |  User Rating
Rate It


Jul26
लोकशाही निवडणुका आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिव
लोकशाही निवडणुका आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

निवडणुका आणि लोकशाही ह्या सर्व अनिष्ट बाबींवरील रामबाण इलाज आहेत असे आम्हाला खरोखर वाटते किंवा तसे आम्ही भासवतो..

पण खोलात जाऊन पाहिले तर; निवडणुका आणि लोकशाही ही देखील इतर साधनांप्रमाणे उत्तम समाज आणि व्यक्ती घडवण्याची साधने आहेत. पण इतर सर्व साधनांकडे (उदा. व्यक्ती आणि समाजजीवनातील शिस्त, जबाबदारी, चातुर्य, प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, चिकाटी, धैर्य, सहकार्य, सहिष्णुता, दयाळूपणा, नि:पक्षपातीपणा) दुर्लक्ष करून त्यांचा प्रमाणाबाहेर उदोउदो केला तर ते घातक ठरेल.

सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्वाची बाब म्हणजे सदसदविवेकबुद्धीला स्मरून निर्भयपणे निवडणुकीत प्रचार करण्याची, मतदान करण्याची आणि निवडून आल्यास व्यक्ती आणि समाजाचे हित जपण्याची क्षमता अंगी बाळवणे.

हे कसे शक्य होईल?

ह्यासाठी, सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांच्या उपदेशाचा सारांश प्रपंचातील कर्तव्यात भगवंताचे स्मरण आणि बहुतेक सर्व दृष्ट्या महापुरुषांच्या उपदेशाचा देखील सारांश असा आहे की नामस्मरण करा आणि अंतरात्म्याशी वा हृदयस्थ परमेश्वराशी एकरूप होत होत तज्जन्य विश्वकल्याणकारी आणि सामर्थ्यदायी प्रेरणेतून कार्य करत आयुष्याचे सार्थक करा!

मग व्यक्ती आणि समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी निवडणुकांच्या अगोदर, निवडणुकांच्या दरम्यान आणि निवडणुकांच्या नंतर अगदी निरंतरपणे नामस्मरणाला सर्वोच्च प्राधान्य नको का द्यायला?


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4958)  |  User Rating
Rate It


Jul26
संशय (देहबुद्धी आणि कुसंग) आणि नामस्मरण: डॉ. श
संशय (देहबुद्धी आणि कुसंग) आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, "गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे”.

पण नामस्मरणाबद्दल आपल्याला संशय असतो. हा संशय केवळ बुद्धीच्या संभ्रमामुळे किंवा गोंधळामुळे असतो असे नव्हे तर, बुद्धीला पटले, तरी देखील आपल्याला नामाबद्दल खात्री वाटत नाही. नामाचे महत्व वाटत नाही. नामाबद्दल पुरेशी ओढ आणि प्रेम वाटत नाही. नामामध्ये गुंतणे किंवा रमणे दूरच; नामाबद्दल ऐकताना देखील आपल्याला काही वेळाने कंटाळा येतो. गुरूबद्दल आदर असला आणि प्रेम असले तरी देखील हे सर्व असल्यामुळे गुरुचा उपदेश आपल्या आचरणात येत नाही.

पण याबद्दल खिन्न व निराश होण्याचे मुळीच कारण नाही.

कारण आपण; आपले मन, वासना आणि गरजा यामध्ये अडकलेले असतो आणि आपले मन, वासना आणि गरजा; आपल्या मेंदूतील स्त्रावांशी, अनैच्छिक मज्जा संस्थेशी, आपल्या अंतस्त्रावी ग्रंथींशी आणि आपल्या शरीरातील असंख्य रासायनिक क्रिया आणि प्रक्रियांशी निगडीत असतात. ह्या अवस्थेला देहबुद्धी म्हणतात. संशयाच्या मुळाशी देहबुद्धी असते! देहबुद्धीमुळे आपण नामाच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच खाली खेचले जात असतो.

संग म्हणजे आपला सहवास, आस्था, गुंतणे, लक्ष, वा आवड! नामस्मरणाला पोषक अशी व्यक्ती, असे वातावरण, अशी जागा म्हणजे सत्संग आणि ह्याला विरोधी तो कुसंग!

देहबुद्धी आणि कुसंग वाईट म्हणून नाहीसे होत नाहीत आणि चांगले म्हणून समाधान देत नाहीत! देहबुद्धी, कुसंग आणि तज्जन्य सुख दु:ख ह्यानाच प्रारब्ध म्हणतात. हे प्रारब्ध; व्यक्ती, समाज आणि देशाला लागू असते.

स्वत:चे, समाजाचे आणि देशाचे प्रारब्ध मान्य करणे आणि (नामस्मरण आणि नामस्मरणाला पोषक ते सर्व करत आणि नामस्मरणाला घातक ते सर्व जमेल तसे टाकत) त्यावर मात करणे हा प्रारब्धावरील रामबाण उपाय आणि अपरिहार्य असा युगधर्म आहे.

हे सर्व समजणे ही नामकृपा किंवा गुरुकृपा आहे कारण गुरु आणि नाम हे अभिन्न असतात; आणि हे सर्व यशस्वीपणे करता येणे ह्यालाच आपण गुरुविजय किंवा नामविजय असे म्हणू शकतो.

पुरातन कालापासून चालत आलेली ही विजयी परंपरा आहे.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4885)  |  User Rating
Rate It


Jul22
गुरुमाऊलीची कृपा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुमाऊलीची कृपा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

ज्याप्रमाणे मुलाला कशाची गरज आहे हे आईला बरोबर कळते आणि ती मुलाला दूध देते; त्याप्रमाणे आम्हाला आमच्याच हृदयातील चैतन्याची तहान लागली आहे हे आमच्यातल्या चैतन्याची जननी ओळखते.

आम्हाला आमची तहान कळत नाही आणि समोर आलेल्या चैतन्याचे महत्व आम्हाला कळत नाही! त्यामुळे समोर आलेले चैतन्य आम्ही लाथाडतो! पण आमचा नतदृष्टपणा पदरात घेऊन, कधी गोंजारून तर कधी वेळ पडल्यास धाकदपटशाने वा आम्हाला शिक्षा देऊन चैतन्याची माउली आमची तहान भागवतेच!

मातृत्व हे वैश्विक असले तरी स्थूल देहाची आई वेगवेगळी असु शकते; हे जसे खरे तसेच आपल्याला चैतन्याचे पान घडवणारी आपल्यातल्या चैतन्याची आई देखील मूलत: एकच असली तरी, व्यावहारिक दृष्ट्या वेगवेगळी असते. हिलाच आपण “आपली गुरुमाउली” म्हणून ओळखू लागतो!

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ही माझी गुरुमाउली. त्यांच्याच चरित्र आणि वाङमयाद्वारे; नामस्मरण हा सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाचा राजमार्ग आहे; आणि नामस्मरणाशिवाय शाश्वत समाधान, सार्थकता आणि पूर्णत्व साध्य होऊ शकत नाहीत याची खात्री झाली.

बाळाचे भूकेलेपण, त्याचे रडणे आणि आईचे त्याला दूध पाजणे हे तीनही एकत्र आले की उभयतांची तृप्ती होते! श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ह्या माउलीने रामनामाचे अमृतपान करवून अशी तृप्ती साध्य केली.

गुरुमाऊलीच्या ह्या कृपेने ऊर कृतज्ञतेने भरून जातोा!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5004)  |  User Rating
Rate It


Jul22
समाधान आणि नामस्मरण: डॉ.श्रीनिवास कशाळीकर
समाधान आणि नामस्मरण: डॉ.श्रीनिवास कशाळीकर

षड्रिपु म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. हे आपले अविभाज्य अंग आहेत! पण तेच आपल्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या अस्वस्थतेला, असहाय्यतेला आणि खिन्नतेला कारणीभूत होतात हे सत्य आहे!

शरीरक्रियाशास्त्रीय दृष्ट्या पाहिल्यास षड्रिपु नसणे शक्य नाही. पण म्हणून षड्रिपु त्याज्य आहेत असे मानून आपण त्यांच्या पासून मुक्त होऊ शकत नाही. पण हे देखील खरे की काळात-नकळत आयुष्यभर त्यांच्या मागे लागून; आपण, आपले कुटुंब आणि समाज तृप्त देखील होत नाही! समाधानी होत नाही!

असे का होते?

कारण षड्रिपुंची पूर्ती दिशाहीन अग्नीप्रमाणे असते! ज्याप्रमाणे दिशाहीन अग्नीने स्वयंपाक शिजत नाही, त्याप्रमाणे षड्रिपूंच्या पुर्तीची धग अंतर्मनापर्यंत आणि अंतरात्म्यापर्यंत पोचत नाही!

जीवनातील सर्व सुख दु:ख्खाना नामस्मरणाच्या चुलीद्वारे दिशा मिळाली तरच त्यांची धग अनंतरात्म्यापर्यंत पोचू लागते आणि आपले, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे समाधान होऊ लागते!

म्हणूनच सर्वंकष समाधान मिळवायचे असेल तर जीवनामध्ये नामस्मरणाची तीव्र गरज आहे! अर्थात ह्याचा अनुभव नामस्मरणानेच येऊ शकेल. केवळ विचाराने, वाचनाने किंवा अन्य कोणत्याही मार्गाने नाही!

श्रीराम समर्थ!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (6123)  |  User Rating
Rate It


Jul20
नामस्मरण आणि पतीपत्नी डॉ. श्रीनिवास कशाळी
नामस्मरण आणि पतीपत्नी डॉ. श्रीनिवास कशाळीकर

अहंकारानमुळे पतीपत्नी भांडतात आणि भांडत राहतात.

पण गुरुकृपेने लाभलेल्या नामाने तेच पती आणि पत्नी नामस्मरण करता करता हळू हळू अहंकारावर मात करून एकमेकांशी एकरूप होतात.

प्रत्येक पतीपत्नीमध्ये अशा दैवी प्रणयाचा अंश असतोच. नामस्मरणाने तोच दैवी आणि उदात्त अंश फुलतो आणि पूर्णत्वाकडे जातो!!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4586)  |  User Rating
Rate It


Jul20
षड्रिपु आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीक
षड्रिपु आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर

षड्रिपु म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. षड्रिपू असण्याचे कारण म्हणजे; मेंदू आणि शरीरातील इतर भागात स्त्रवणारे वेगवेगळे अंतस्त्राव, ज्यांना अनुक्रमे न्युरोट्रान्समीटर्स आणि होर्मोंस म्हणतात. शरीरक्रियाशास्त्रीय दृष्ट्या पाहिल्यास सर्वसामान्यपणे; अंतस्त्राव अजिबात नसणे शक्य नसल्यामुळे, षड्रिपु अजिबात नसणे शक्य नाही. त्यामुळे षड्रिपु त्याज्य आहेत असे कितीही कंठरवाने स्वत:ला आणि इतरांना ठासून सांगितले आणि समजावले आणि कितीही आटापिटा केला तरी आपण कुणीही त्यांपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही! तसा दावा कुणी केला तर तो केविलवाणा वेडेपणा असतो!

त्याचप्रमाणे, आपण आयुष्यभर जरी त्यांच्या मागे फरफटत गेलो, तरी तृप्त आणि समाधानी होऊ शकत नाही! कारण षड्रिपुंची पूर्ती ही फडफडणाऱ्या विस्तवाप्रमाणे असते! फडफडणारी आग जशी अन्न शिजवू शकत नाही, त्याप्रमाणे षड्रिपुंच्या पूर्तीची धग अंतर्मनापर्यंत आणि अंतरात्म्यापर्यंत पोचू शकत नाही आणि समाधानाचे अन्न शिजवू शकत नाही! म्हणूनच वासनापुर्तीने आपले समाधान झाले असा दावा कुणी केला तर तो देखील केविलवाणा भंपकपणा असतो!

ज्याप्रमाणे चुलीमुळे आग नियंत्रित होते आणि तिची धग भांड्याला नीटपणे लागून अन्न वेळेमध्ये शिजते, त्याचप्रमाणे जीवनातील सर्व भोगांची आणि उपभोगांची धग नामस्मरणरुपी चुलीमुळे अंतरात्म्याकडे पोचते आणि अंतरात्म्यामध्ये समाधानरुपी अन्न शिजू लागते. साहजिकच आपले, आपल्या कुटुंबियांचे आणि समाजाचे समाधान होऊ लागते! ज्याप्रमाणे चुली आणि त्यांच्यातील आग कमी जास्त असते, त्याचप्रमाणे नामसाधकांच्या प्रगतीचे टप्पे देखील वेगवेगळे असतात. पण नामस्मरणाने समाधानाकडे वाटचाल होऊ लागते; हे केवळ सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्याच नव्हे तर सर्वच संत महात्म्यांच्या शिकवणीचे त्रिवार सत्य असे सार आहे.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4610)  |  User Rating
Rate It


Browse Archive