Sep18
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 18th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर लेखांक ९.
प्रश्न ३.
(अशुभ म्हणजेच सच्चिदानंदाच्या आड येणारे सर्व नष्ट होण्यासाठी) स्तुवन्त: कं म्हणजे स्तुती करण्यायोग्य कोण आहे किंवा कुणाची स्तुती करावी? ह्या अगोदर वर्णन केलेली सद्गती म्हणजेच सर्वांच्या अंतरंगातील हे स्थान; निराकार, अदृश्य म्हणजेच निर्गुण असल्यामुळे त्याविषयी कल्पना करता येत नाही. एका बाजूने सर्वांना उत्कट आणि अनामिक ओढ तर लागते, पण दुसऱ्या बाजूने त्याविषयी गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता असते. विपरीत कल्पना निर्माण होण्याची शक्यता देखील असते.
अशी विपरीत कल्पना होऊ नये, म्हणून आत्मज्ञानी आणि आत्मसाक्षात्कारी सदगुरूंकडे धाव घेणे आणि त्यांना प्रश्न विचारणे वा सांकडे घालणे गरजेचे आणि योग्य असते. आपल्याला योग्य ज्ञान मिळावे, आपली इच्छा योग्य दिशेला वळावी आणि आपल्याकडून योग्य क्रिया घडावी ह्यासाठी सद्गुरुंचे अंतरंग आणि आपले अंतरंग जोडले जाणे आवश्यक असते. ह्यालाच सद्गुरुकृपा म्हणतात. अशा सद्गुरुकृपेने आपला जिव्हाळा (जो दुधावरील सायीप्रमाने किंवा ताकावरील लोण्याप्रमाणे आपल्या जीवनाचे सर्वस्व असतो, तो अनुचित प्रकारे अनुचित ठिकाणी न जाता) योग्य शब्दातून आणि योग्य ठिकाणी पोचावा म्हणून आर्ततेने विचारलेला हा प्रश्न आहे.
आत्मज्ञानी जगद्गुरू महर्षी वेदव्यास यांनी विश्वकल्याणासाठी आपणच हा प्रश्न महाराज युधिष्ठीर यांच्याद्वारे भीष्म पितामह यांना विचारून आपणच भीष्मचार्यांच्याद्वारे त्याचे समर्पक उत्तर पुढे दिले आहे.