Jul17

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 17th July 2016
प्रेम आणि नामस्मरण डॉ.श्रीनिवास कशाळीकरनिर्भेळ, शुद्ध, सर्वव्यापी, कालातीत आणि अजरामर प्रेम कोणत्याही बाह्य लक्षणावरून निश्चित करता येत नाही. उदा. पत्रापत्री, फोनाफोनी, एसएमएस, भेटीगाठी, दंडवत, नमस्कार, मानसन्मान, गळाभेटी, आलिंगन, आहेर, देणगी, बक्षीस, गिफ्ट, प्रेझेंट, सेवा, आश्वासने, मधुर भाषण, स्तुती, ओढ, हास्य, अश्रू, लाड करणे, गोंजारणे, इत्यादी! ही लक्षणे; वरवरची, दिखाऊ, भ्रामक, आणि फसवी असू शकतात.
संकुचित स्वार्थरहित, पूर्वग्रहरहित, भेदभावरहित, भितीरहित, दबावरहित, द्वेषरहित, पूर्वअटरहित; विचार, भावना आणि व्यवहार; म्हणजे मूर्तिमंत निर्भेळ प्रेम, शुद्ध प्रेम! असे प्रेम सर्वव्यापी, कालातीत आणि अजरामर असते. पण; वरील सर्व शब्दांपलीकडील आणि अनिर्वचनीय असे प्रेम; केवळ सद्गुरूचे असते आणि ते चिरंतन अर्थात अजरामर असते.
ह्या अमृताचा अगदी अंशत: अनुभव देखील जीवन झळाळून टाकणारा असतो आणि तो येण्यासाठी चित्तशुद्धी होत राहण्याची आवश्यकता असते. ही चित्तशुद्धी नामस्मरणाद्वारे होत जाते आणि ती चित्तशुद्धी देखील कोणत्याही बाह्य लक्षणाने ओळखता येत नाही आणि दाखविता येत नाही!