Aug22
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 22nd August 2015
गुरुकृपेची महती;चैतन्यमय होत जाणे! डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: कुंभ मेळाच नव्हे तर, अनेक बाबींबद्दल आपल्याला फारसे काही कळत नाही असे जाणवते. निसर्ग किती अनादि आहे, जग किती विशाल आहे आणि त्यात आपले जीवन किती टीचभर आणि क्षणभंगुर आहे!
शिक्षक: म्हणूनच “मोलाचे आयुष्य दवडीसी वाया मध्यान्हीची छाया जाई वेगे” असे म्हणतात. आपल्या विस्मृतीत गेलेले अजरामर चैतन्य ओळखणे, आठवणे आणि अखेर आपण तेच आहोत असा अनुभव घेणे हे जीवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि प्रत्येक क्षण आपण त्यासाठी खर्च करण्याची आपल्याला सुवर्ण संधी आहे. त्यातच जीवनाची खरी पूर्णता आणि सार्थकताही आहे! एका दृष्टीने पाहता; सार्थक जीवनाची ही कथाच अजरामर रामकथा वा चैतन्यकथा आहे.
विद्यार्थी: होय. चैतन्य वगळले तर आपल्यात काहीच नाही! भूकंप, ज्वालामुखी, सुनामी अशा निसर्गाचे अगाध सामर्थ्य दाखवणाऱ्या घटनाच नव्हेत तर; प्राणी जीवनामध्ये आणि मानवी जीवनामध्ये देखील अशा असंख्य बाबी आहेत की त्या व्यक्तिश: आपल्या आवाक्याबाहेर आहेत! कुंभ मेळ्यातले साधुच पहा ना! ते ज्या गोष्टी करतात, त्या आपल्यासाठी अशक्यच असतात.
शिक्षक: अगदी बरोबर आहे! जे अगदी सोप्यातले सोपे साधन आहे; असे आपण म्हणतो, ते नामस्मरण देखील रोज एवढे करणार म्हणून होतेच असे नाही!
पण गुरुकृपेमुळे एक महत्वाची बाब मला कळली, ती अशी की आजपर्यंत अब्जावधी लोक जाणूनबुजून नामस्मरण; म्हणजेच ईश्वराचे, म्हणजेच स्वत:च्या अंतरात्म्याचे स्मरण करीत आले आहेत; हे उघड उघड दिसत असले तरी आपल्याला अंतर्बाह्य व्यापणाऱ्या विश्वचैतन्याची जननी, गुरुमाउली; चैतन्याच्या कृपावर्षावाच्या रुपात; आपले सर्वांचे स्मरण, भरण, पोषण आणि संचालन; अनादी कालापासून अदृश्यपणे करीत आली आहे आणि अनंत कालपर्यंत करीत राहणार आहे; हे उघड दिसत नाही! साहजिकच ही मनाला दिलासा देणारी बाब एरवी लक्षात येत नाही.
गुरुकृपेची महती अशी की; नामस्मरणाद्वारे; आपण चैतन्यमय होत जाणे, आपले वैयक्तिक आणि सामाजिक कल्याण होणे; हे अटळ बनले आहे. ते; टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही!
विद्यार्थी: धन्यवाद सर! रोजच्या कटकटी जीवन नकोसे करतात. त्यातच वाढती हिंसा आणि वाढता अनाचार; यांमुळे जीवन नकोसे होते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा हा अनुभव सांगून फारच मोठ्ठा धीर दिला आहे. एरवी आमच्या बळावर आम्ही इतरांना सोडाच, स्वत:ला देखील चेतना देऊ शकत नाही! गुरुकृपाच आपल्या सर्वांसाठी संजीवनी आहे!