Aug21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
१०. देवाची (खरी) कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देतो.
आपल्यातल्या बहुतेकांना तर याच्या उलट वाटत असते! आपला समज असा असतो की जेवढा पैसा जास्त मिळेल, तेवढे आपण जास्त सुख मिळवू शकतो! त्यामुळे गडगंज पैसा मिळणे हेच भाग्याचे लक्षण आणि हीच देवाची कृपा असेच आम्हाला वाटत असते! अगदी मनापासून विचार केला तरी, पोटापुरत्या पैशाने सुख मिळू शकत नाही आणि म्हणून गरीबी हा शापच आहे असेच आम्हाला वाटत असते!
मग खरं काय? सद्गुरू की आपण?
उत्तर सोपं आहे!
पण सद्गुरूंच्या अनंत, परिपक्व आणि नि:पक्षपाती सर्वज्ञतेचा अभिप्राय असा की जास्त पैसा मिळाला की आपण भरकटू शकतो! आपल्या आकांक्षा वाढतात, वासना भडकतात, इर्षा उसळते, काळजी पोखरते, असंतोष खदखदू लागतो! ह्या सर्व बाबी सुख द्यायचे सोडाच, समाधानाच्या आडच येतात! जास्त पैशामुळे अश्या तऱ्हेने आपली अस्वस्थता वाढते. असमाधान वाढते. ह्या सर्व बाबी नियंत्रणात ठेवणे ही अत्यंत कठीण आणि कसोटीचीच बाब असते! भल्याभल्याना जास्त पैशामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवणे अशक्य होते! अनेक छंद, व्यसने आणि हितशत्रू यामुळे संकटे वाढतात!
जास्त पैशामुळे आपण सहज मार्गभ्रष्ट होऊ शकतो आणि रसातळाला जाऊ शकतो!
उलट पोटापुरता पैसा मिळाला तर आपल्या वासना आणि हाव ह्यांच्यावर आणि स्वैराचारावर आपसूक बंधने येतात! सुरुवातीला ही बंधने त्रासदायक वाटली तरी, नामस्मरणाची जगोडी वाढण्यासाठी ह्या बंधनांचा आपल्याला फायदाच होतो!
म्हणूनच सद्गुरू म्हणतात तेच खरे आहे! पोटापुरता पैसा मिळणाऱ्या आपल्यातल्या बहुसंख्यांवर देवाची कृपा आहे!