गोंदवलेकर महाराज मला समजलेले १७. प्रपंच हे
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 21st August 2016
१७. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे”.
लहानपणी साधन आणि साध्य ह्यामध्ये घोळ होतो हे खरे, पण मोठेपणी देखील समजुतीमध्ये जरी नाही तरी पण वागण्यात मात्र गोंधळ होतो!
नामस्मरणाचा अभ्यास करताना एकदम काही आपल्याला आत्मज्ञान होत नाही. आपण सामान्यच असतो. आतील आणि बाहेरील जगाचे आपल्यावर बरे-वाईट परिणाम होतच असतात. त्यामुळे आपली माफक अपेक्षा असते की; सरकारने अश्या योजना आखाव्या, अशी धोरणे राबवावी, असे कायदे आणि नियम करावे की ज्यांचे पालन करताना आपल्या सदसद्विवेक बुद्धीचा कोंडमारा होणार नाही, आपले जगणे मुश्कील होणार नाही आणि असहाय्य होणार नाही! कारण तसे झाले की कायदे मोडावे लागतात किंवा कायद्यामधून पळवाटा काढाव्या लागतात. मनात असो वा नसो अशी चोरी करावी लागते. मग कायद्याने शिक्षा मिळण्याची जशी भीती असते तशीच स्वत:चे मन देखील स्वत:ला खात असते.
उलट, हे कायदे जर सुयोग्य असले, तर ते पाळल्यामुळे आपल्या अंतरात्म्याचे समाधान होत राहील आणि जीवनाची कृतकृत्त्यता, कृतार्थता आणि सार्थकता झाल्याची जाणीव आपल्याला होत राहील!
पण असे घडताना दिसत नाही! कायदे पाळताना (ते अन्याय्य असल्यामुळे) आणि मोडताना (भीतीमुळे वा मन खात असल्यामुळे) दोन्ही प्रसंगी आपल्या आतल्या आत संघर्ष चालूच राहतो. काय करावे हे आपल्याला सुचत नाही! आपण खिन्न होतो. असहाय्य होतो.
नाम आणि नामस्मरण यांची तोंडओळख झाली की, नकळत आपल्या संकुचित बुद्धीनुसार आपल्या मनात त्याविषयी अवास्तव कल्पना तयार होतात. नामाची सत्ता बलवत्तर आहे असे ऐकल्यामुळे; नामस्मरणाने सर्व परिस्थिती बदलेल ही आशा पल्लवित होते! नामस्मरणाने आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक अश्या सर्वच कल्पना आणि अपेक्षा पूर्ण होतील असे आपल्याला वाटू लागते.
त्याप्रमाणे; परिस्थिती बदलण्यासाठी आपण अधिक जोर देऊन नामस्मरण करू लागतो. असे करताना अनवधानाने आपण नामस्मरणाला (भगवंताला) साधन बनवतो आणि आपल्या कल्पनेतल्या कौटुंबिक व सामाजिक प्रपंचाला साध्य! मग कुटुंबात वा समाजात मनासारखे घडले नाही की निराश होतो!
पण आपली वैयक्तिक आणि सामाजिक परिस्थिती कशीही असली तरी हताश न होता आणि खचून न जाता; आपण आपल्या सद्गुरूंचे, श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे वचन, पुन्हा पुन्हा लक्षात आणून आहे त्या परिस्थितीचा (प्रपंचाचा) उपयोग परमेश्वर प्राप्ती साध्य करण्यासाठी केला तर असहाय्यता नक्कीच कमी होते.
थोडक्यात सांगायचे तर, चिकाटीने नामस्मरण करीत गेले, की कालांतराने समजू लागते, की वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील सारे काही आपल्या मनाप्रमाणे नाही, तर प्रारब्धाच्या नियमांनुसार, पण नामाच्या सत्तेनेच घडत असते! तसेच हे देखील कळू लागते की सरकार सरकार असे ज्याला आपण म्हणतो, ते सरकार देखील कालमहात्म्यानुसार खरे, पण नामाच्या सत्तेखालीच वावरत असते!
नामाच्या सत्तेनेच आपल्या कळत-नकळत; अगदी तंतोतंत आपल्या मनाप्रमाणे जरी नाही तरी श्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना अभिप्रेत असलेल्या संस्कृती आणि सुधारणा; आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात अधिकाधिक प्रमाणात आविष्कृत होत असतात! सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार; वेगवेगळ्या स्वरूपात प्रत्यक्षात येत असतात.
अश्या तऱ्हेने; नामस्मरण करता करता नामाचे गोडी वाढते. नामातील शक्ती जाणवते. अलगद आपल्या कल्पना, आपल्या अपेक्षा आणि आपल्या आवडी निवडी बाजूला पडतात.
नामच धरून राहिले की, नामाच्या इच्छेनुसार आपण स्वत: आणि जग दोन्हीही नामाच्या सत्तेने आणि सुयोग्य पद्धतीने बदलतात; याचा प्रत्यय घेऊ लागतो. मग नामासाठीच नाम घेऊ लागल्यावर नाम साध्य व प्रपंच साधन आहे हे नुसते पटत नाही, तर साधनरूप प्रपंचामागे होणारी आपली फरफट कमी कमी होत जाते. नामासाठी आणि नाम (परमार्थ) हे साध्य म्हणून आहे ती परिस्थिती (प्रपंच) साधन म्हणून वापरून नामस्मरण करणे हेच आपल्या सर्वांच्या कल्याणाचे आहे ह्याची खात्री पटत जाते!
Rate It