Aug20
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Thursday, 20th August 2015
असे का होते?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: कुंभ मेळ्यामुळे असो की अन्य उत्सवांच्यामुळे; आपल्या रोजच्या जीवनातील दुष्ट शक्तींचा प्रभाव कमी होताना दिसत नाही! असे का होते?
शिक्षक: आपल्या परंपरा, आपले सण, आपले उत्सव, आपली व्रते ह्या सर्वांना महत्व आहे. पण त्यांचा उद्देश काय, त्यांचे महत्व किती आणि त्यांचे सामर्थ्य किती; हे आपल्याला कळत नाही. त्यांचा उद्देश; आपल्याला आपल्या आंतरिक चैतन्याचा आणि अमरत्वाचा अनुभव आणून देणे हाच आहे. ह्याच अनुभवाच्या मार्गावर असताना आपल्यात विधायक बदल होतात आणि वैयक्तिक व सामाजिक कल्याण साकार होते. म्हणूनच आणि त्यासाठीच; उत्सवांच्या पूर्वी, मध्ये आणि नंतर नामस्मरण करणे आणि करीत राहणे हे अत्यावश्यक आहे. आपण नामस्मरण केल्याशिवाय हे उत्सव चैतन्यमय आणि कल्याणकारी होऊ शकत नाहीत! किंबहुना; आपण काहीच न करता; ते आपसूक आणि स्वतंत्रपणे सामाजिक परिवर्तन घडवून आणतील असे समजणे ही एक मोठ्ठी गफलत आहे.
विद्यार्थी: नामस्मरणाने समाज कल्याण कसे होते हे पुन्हां एकदा सांगा.
शिक्षक: नामस्मरण करता करता ज्या प्रमाणात आपले संकुचित आणि मर्त्य व्यक्तित्व क्षीण होत जाते त्या प्रमाणात संकुचित दृष्टिकोन, विचार, भावना, वासना, ईच्छा, संकल्प आणि क्रिया यातून आपण हळु हळु मुक्त होत जातो. परिणामी आपले जीवन आणि समाजाचे जीवन; पवित्र प्रेमाने, व्यक्तिनिरपेक्ष दृष्टीकोनाने, उदात्त हेतूने, शुद्ध प्रेरणेने, न्यायी वृत्तीने, सदसद्विवेकबुद्धीने, आणि पूर्वग्रहविरहित भावनेने, नियंत्रित आणि संचालित होऊ लागते.
विद्यार्थी: अंतर्बाह्य चैतन्यामृताचा अनुभव घेण्याची ही चैतन्यसाधना खरोखरच सर्वांना शक्य आहे का?
शिक्षक: होय. खरोखरच ती सर्वांना शक्य आहे. सर्व धर्मांच्या, जातींच्या, पंथांच्या, वंशांच्या, देशांच्या, तसेच सर्व वयांच्या आणि व्यवसायांच्या लोकांना ही साधना शक्य आहे. अशिक्षित-सुशिक्षित, रोगी-निरोगी, अपंग-धडधाकट, सर्वांना शक्य आहे. त्याचप्रमाणे मनुष्य अशक्त असो वा सशक्त, व्यसनी वा निर्व्यसनी, अपराधी वा निरपराधी, गरीब वा श्रीमंत, सामान्य वा सत्ताधारी, कुणीही याला अपवाद नाही.
विद्यार्थी: पण हा एक चमत्कारच नाही का?
शिक्षक: हा चमत्कार वाटला तरी चैतन्यसाधना सर्वांना शक्य आहे कारण.... चैतन्यसाधनेचे मूळ असलेली चैतन्यतृष्णा कमी अधिक प्रमाणात असेल कदाचित; पण आपल्यातल्या सर्वच्या सर्वांना आहे! ज्ञानेश्वर महाराज ज्याला विश्वाचे “आर्त” असे म्हणतात तीच ही चैतन्यतृष्णा!