Mar15
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 15th March 2013
राम कर्ता: डॉ. श्रीनिवास कशालीकरया विश्वामध्ये आपण सर्व (मानव, प्राणी, वनस्पती, इतर सजीव आणि निर्जीव), विशिष्ट ऊर्जा, क्षमता, विविध गुण आणि सृजनाशीलता यानी परिपूर्ण असतो. पण आपल्याला याची यथार्थ जाणीव, कल्पना नसते.
एका टप्प्यावर आपल्यामध्ये वासना, भावना, विचार आणि दृष्टिकोन; प्रगट होऊ लागतात. अश्या तर्हेने आपल्यातला "मी" जागृत होतो; आणि आपण; वस्तू, पैसा, जोडीदार, घर, नोकरी; किंवा सत्ता, समाजकार्य, लोकसेवा वगैरे मध्ये गुंतून जातो. हे सर्व आपल्या अंतर्मनात आणि जागृत मनामध्ये चालू असते. अश्या तर्हेने आपल्या हातून बर्या वाईट गोष्टी घडत जातात आणि त्यातून येणार्या सुख दु:खातून आणि यश-अपयशातून आपले आणि संपूर्ण विश्वाचे स्वरूप घडत आणि बिघडत जाते!
गुरू म्हणजेच राम. तो काळ, अवकाश आणि आपल्या सर्व जाणीवांच्या अतीत आहे. त्याच्याच कृपेने आपल्याला नामाची संजीवनी प्राप्त होते. त्याच्याच कृपेने तोच सर्वाच्या अन्तर्यामी असल्याचे कळू लागते. त्याच्याच कृपेने आपले संकुचित शहाणपण, क्षुद्र गर्व, अनाठायी हट्ट, अवाजवी आग्रह आणि हीन अहंकार गळून पडू लागतात. त्याच्याच कृपेने आपल्या सवांच्या अन्तर्यामी असलेल्या त्याच्या सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती आणि अम्रुतमयी सान्निध्याची प्रचीती येऊ लागते.
त्याच्याच कृपेने बाकी सर्व ध्येये बाजूला पडत जातात आणि त्याचीच काय ती ओढ तीव्र होत जाते. त्याच्याच कृपेने नामस्मरणातील गोडी आणि सातत्य वाढत जाते. त्याच्याच कृपेने अश्या रीतीने जीवन कृतज्ञता आणि सार्थकता यानी भरून जाते.
हेच जीवनाचे सर्वोच्च साफल्य!
श्रीराम समर्थ!!!