May19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 19th May 2015
वैश्विक वसंत: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरवैश्विक वसंत बहरत आहे. पण त्याची चाहूल सहज लागत नाही. त्यामुळे निराशा येते. जीवन व्यर्थ वाटते. उलटपक्षी इतर लोकांचे यश पाहून देखील; स्वत:विषयी न्यूनता येऊन खिन्नता वाटते.
पण इतरांमध्ये किंवा आपल्यामध्ये कितीही दोष दिसले तरी घाबरण्याचे कारण नाही. आपल्या सर्वांच्या अंतरंगात लोककल्याणकारी उर्जा आहे. आपल्या अंतरंगाशी आणि इतरांच्या अंतरंगाशी जोडले जाणे म्हणजेच योग. नामस्मरण हा बहुतेक सर्वांना पटेल, जमेल, रुचेल असा योगमार्ग आहे. म्हणूनच नामस्मरणाद्वारे आपल्या आणि सर्वांच्या अंतरंगातील चैतन्यदायी उर्जा आपल्याला मिळते आणि खिन्नता नाहीशी होते.
वैयक्तिक गरजांचे आणि संकुचित स्वार्थाचे बंधन आणि ओझे अंगवळणी पडून आवडू लागल्यामुळे आणि आळसामुळे सुरुवातीला; नामस्मरणाचा वीट देखील येउ शकतो. पण तरीही नामस्मरण करीत राहिले तर हळू हळू आपल्या आणि इतरांच्या अंतरंगातील सच्चिदानंदाची आणि विहंगम वसंताची संजीवक प्रचीती येते. ह्या निरागस प्रेममय प्रचीतीतून लोक कल्याणाची महान कार्ये स्फुरतात आणि साकारतात. हाच खरा योग, हाच खरा स्वधर्म आणि हीच खरी भक्ती.