Aug19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 19th August 2015
क्षीरसमुद्र म्हणजे काय? डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: क्षीरसमुद्र म्हणजे काय?
शिक्षक: शब्दश: पाहिल्यास क्षीर समुद्र म्हणजे दुधाचा समुद्र. पण माझ्या समजुतीप्रमाणे क्षीरसमुद्र म्हणजे देखील दुसरे तिसरे काही नसून; आपली संपूर्ण मज्जासंस्था किंवा चेतासंस्था असावी. कारण, अगदी वास्तविक दृष्टीने पाहता देखील, मज्जासंस्थेचे आवरण हे पांढरे असते. असो. ह्या ‘अमृतमंथना’च्या प्रक्रियेमधून आपल्या पूर्वजांना एक महत्वाचा शोध लागला असावा.
विद्यार्थी: कोणता बरे हा शोध?
शिक्षक: ह्या घटनेमध्ये; जेव्हां विशिष्ट ग्रहस्थिती ह्या चार ठिकाणी येते, त्या त्या दिवशी, आणि त्या त्या ठिकाणी “अमृत सांडले” असे म्हटले आहे. “अमृत सांडले” ह्या शब्दांतून हा शोध दृग्गोचार होतो!
हा शोध म्हणजे, ठराविक अवधीनंतर; ठराविक जागी, ठराविक ग्रहस्थिती असताना तेथील अणुरेणुंमध्ये उर्ध्वगामी विकासाला (सम्यक विकासाला) अनुकूल असे विशिष्ट फेरबदल घडून येतात.
ज्यांना हा शोध लागला आणि ज्यांनी हे सांगितले; त्यांचा; हे सांगण्यामागे, कोणताही वैयक्तिक स्वार्थ किंवा अहंकार नसल्यामुळे त्यांच्या म्हणण्याला लोकांच्या हृदयात स्थान मिळाले असावे आणि लोकांचा त्यावर दृढ विश्वास बसला असावा. साहजिकच ह्या विशिष्ट ग्रहस्थितीला त्या ठिकाणचा आसमंत पवित्र होतो आणि अमृतत्वाने भरून जातो, अशी धारणा पक्की तयार झाली असावी. विशेषत: तेथील नद्यांमध्ये या दिवशी स्नान केले असता मर्त्य आणि पापी जीवन नष्ट होऊन अमृतत्वाची प्राप्ती होते ही धारणा दृढ झाली असावी आणि ह्या धारणेने लाखो लोक तिथे जमू लागले असावे आणि तेथील नद्यांमध्ये स्नान करू लागले असावे.
विद्यार्थी: विशिष्ट ग्रहस्थितीमध्ये असे काही बदल घडू शकतात?
शिक्षक: हे माझे अभ्यासाचे किंवा संशोधनाचे क्षेत्र नव्हे. पण ज्याप्रमाणे ठराविक काळानंतर दिवस-रात्र होतात आणि ऋतू बदलतात, त्याप्रमाणे वातावरणात ठराविक कालावधीनंतर भूगर्भीय घडामोडी, गुरुत्वाकर्षण, भूचुम्बकीय क्षेत्र किंवा रेडिओलहरींमध्ये देखील वेगवेगळे बदल घडत असू शकतील. अन्य घडामोडी देखील घडत असू शकतील. राहिला मुद्दा शरीरातील बदलांचा. वातावरणातील वेगवेगळ्या बदलांच्याद्वारे आपल्या शरीरातील वेगवेगळ्या रासायनिक, अंतस्त्रावी आणि मज्जासंस्थेमधील घडामोडी बदलतात हे ज्ञात आहे.
वातावरणाच्या परिणामामुळे; शरीरामध्ये अनेक बदल घडतात. वातावरणातील चक्रमय आणि ठराविक काळाने घडणाऱ्या घटनांमुळे शरीरामध्येही ठराविक काळाने चक्रमय (cyclical) पद्धतीने घटना घडतात. अशा घटनाना “जीवशास्त्रीय घड्याळे” (Biological Clocks) म्हणतात.