Aug19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 19th August 2015
कुंभमेळा आणि अमृतकुंभ: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: तुम्ही म्हणता तसा अमरत्वाचा किंवा चैतन्याचा अनुभव न येता देखील; कोट्यावधी लोक कुंभ मेळ्याला का येतात? केवळ पापमुक्ती होते ह्या भावनेने?
शिक्षक: “पापमुक्ती होणे” हे शब्द; स्वत:तील अमरत्वाचा वा चैतन्याचा अनुभव घेण्याची तळमळ; फक्त काही प्रमाणात व्यक्त करणारे आहेत. पण; स्वत:तील अमरत्वाचा वा चैतन्याचा अनुभव घेण्याची तळमळ लागणे; ही मूलभूत प्रवृत्ती आहे! ही मूलभूत प्रवृत्ती आपल्याला कळो वा न कळो; टाळू म्हणून टाळता येत नाही! म्हणूनच करोडो लोक केवळ कुंभ मेळ्याची ठिकाणेच नव्हे तर सर्वच तीर्थक्षेत्रांमध्ये पिढ्यान पिढ्या जातात आणि स्नान करतात! अमरत्वाचा संपूर्ण किंवा यथार्थ अनुभव त्यांना लगेच येतो असे नाही. पण त्या दिशेने त्यांचा प्रवास कळत-नकळत चालू राहतो!
विद्यार्थी: तुमच्या मते, अमृतत्वाची पुसटशी जाणीव देखील वैयक्तिक आणि सामाजिक अशा जीवनाच्या सर्व अंगांमध्ये चैतन्य भरणारी; आणि सर्वंकष उत्क्रांती, व सर्वंकष विकास घडवून आणणारी असते. खरे ना?
शिक्षक: होय! कुंभ मेळ्याच्या प्रथेमागील अमरत्वाच्या अनुभवाचा; म्हणजेच संपूर्ण कल्याणाचा, सर्वंकष विकासाचा आणि अंतर्बाह्य उत्क्रांतीचा उदात्त हेतू; आपण ध्यानात घ्यायला हवा!
विद्यार्थी: पण आज आपण कुम्भ मेळ्याबद्दल अनेक प्रवाद ऐकतो. त्यामुळे मनाचा गोंधळ उडतो!
शिक्षक: ह्याला दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे; आज आपल्यातल्या तमोगुणी असुर वृत्तींनी; अर्थात; संकुचितपणा, भित्रेपणा, भाबडेपणा, भोळेपणा, क्रूरपणा, स्वार्थांधता, ढोंग, लबाडी, चोरी, व्यसने हयांनी; आपले जीवन पोखरले आहे. आपल्या अशा जीवनाचेच प्रतिबिंब कुंभ मेळ्यात पडते. दुसरे म्हणजे; पृथ्वी, पाणी, हवा इत्यादी सर्व आसमंतच नव्हे तर आपली मने देखील प्रदूषित झाली आहेत. आपली वृत्ती कुत्सित आणि दृष्टी कलुषित झालेली असल्याने आपल्याला पवित्र आणि मंगल असे काही दिसतच नाही!
पण; आपण नामस्मरण करीत राहिलो, वा अन्य मार्गाने आपले चित्तशुद्धी झाली, तर आपल्याला समजते की; पापमुक्तीसाठी असो वा अन्य काही कारणास्तव; अशा परंपरा चालू राहिल्यामुळे; होम, हवन, साधन मार्ग, विधी, रूढी, परंपरा हयांचा सखोल आणि मूलगामी अभ्यास करणे आणि त्यांच्यातील लोककल्याणकारी असे सर्व जतन करणे वा जोपासणे आणि अनिष्ट, ते सर्व नष्ट करणे आपल्याला शक्य होणार आहे.