Aug19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 19th August 2015
कुंभमेळ्याच्या निमित्ताने : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: सर, नामस्मरण हा सर्वांच्या कल्याणाचा पर्यायी मार्ग आहे असे गृहीत धरले तरी, कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या त्या ठिकाणी वेगवेगळी साधने, योगाचे प्रकार, यज्ञ, होम, हवन, पूजा-अर्चा, अनुष्ठाने, व्रत-वैकल्ये ह्यांची माहिती सामान्य लोकांनाही होते हे देखील खरे आहे ना?
शिक्षक: होय! कुंभ मेळ्याच्या निमित्ताने अंतीम सत्याचा किंवा अमरत्वाचा अनुभव घेण्यासाठी वेगवेगळे साधन मार्ग अवलंबणारे साधू, साधक, बैरागी, योगी, महंत एकत्र जमतात हे अगदी खरे आहे. त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळते हे देखील खरे आहे. पण हे सगळे शिकत असताना आपली सदसद्विवेकबुद्धी जागी असणे अत्यावश्यक असते. त्याचप्रमाणे तरतमभाव ठिकाणावर असणे महत्वाचे असते. त्याच बरोबर कुंभ मेळ्यामध्ये देखील काय श्रेयस्कर आहे आणि काय हानिकारक आहे हे नीट समजले पाहिजे. खरे ना?
विद्यार्थी: होय. खरे आहे.
शिक्षक: आपली बुद्धी नि:पक्षपाती आणि निस्वार्थी होण्यासाठी नामस्मरण अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. नामस्मरणाने आपला संकुचितपणा, क्षुद्र स्वार्थ, पूर्वग्रह, अभिनिवेश, द्वेष, अहंकार इत्यादी दुर्गुण हळूहळू पण निश्चित गळून पडतात. अशा तऱ्हेने बुद्धी आणि दृष्टी स्वच्छ झाल्यामुळे सत्य जाणून घेणे आणि अनुभवणे शक्य होते! त्यामुळे कुंभ मेळाच नव्हे तर जीवनातली प्रत्येक गोष्ट यथार्थपणे समजण्याची आणि कुवत नामस्मरणाने येते. त्याद्वारेच अखेर सत्य समजणे आणि अनुभवणे शक्य होते! फार काय सांगू? आपण सतत नामस्मरण केल्याने अशी विधायक उर्जा तयार होते की तिच्यामुळे कुंभ मेळ्यामधील असंख्य लोकांना देखील उन्नत होण्यासाठी जोर मिळू शकतो!
विद्यार्थी: नामस्मरण केल्यामुळे अंतीमत: अमरत्वाचा अनुभव येत असला तरी नामस्मरण करता करता; संपूर्ण समाजाचे कल्याण होते असे आपण जे म्हणता ते मला अधिक स्पष्ट करून सांगा.
शिक्षक: नामस्मरणाने समाजाचे कल्याण कसे होते ह्याला जीवशास्त्रातील एक उदाहरण घेतले तर समजायला सोपे जाईल.
ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीच्या उत्तम आरोग्यातून आपले म्हणजे संपूर्ण व्यक्तीचे आरोग्य सिद्ध होते, त्याचप्रमाणे नामस्मरणाने आपल्या वैयक्तिक जीवनात जे सच्चिदानंद वैभव प्रगट होते ते वैभव संपूर्ण समाजात देखील आविष्कृत होते. उलटपक्षी; ज्याप्रमाणे आपल्या संपूर्ण वैयक्तिक आरोग्याने आपल्या शरीरातील पेशी आरोग्यसंपन्न होतात, त्याचप्रमाणे समाजात जे सच्चिदानंद वैभव आविष्कृत होते, ते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात देखील अवतरते!