Aug19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 19th August 2015
व्यक्ती आणि समाज ह्यांचे कल्याण : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: सर, व्यक्ती आणि समाज ह्यांचे कल्याण परस्परावलंबी आहे?
शिक्षक: होय तर! व्यक्ती आणि समाजव्यवस्था हे एक अखंड असे चक्रच आहे. व्यक्तीपासून सुरुवात केली तर; व्यक्तीचे शरीर, संवेदनाशीलता, वासना, भावना, कलात्मकता, सर्जनशीलता, उद्यमशीलता विचार, दृष्टिकोन, विचारप्रणाली, नेतृत्व, सत्ता, धोरणे, कायदे, नियम, योजना, कार्यक्रम, प्रत्यक्ष अंमलबजावणी; तसेच प्रथा, रूढी, संकेत, आणि ह्या सर्वांचे यांचे व्यक्तीवर होणारे परिणाम; म्हणजे अखेर व्यक्तीपर्यंत आपण येऊन पोचतो! असे हे एक अखंड चक्र आहे! नामस्मरणामुळे व्यक्ती आणि समाजव्यवस्थेचे अखंड चक्र नवचैतन्याने संजीवित होते! नामस्मरण हे सर्वांना सुलभ आहे. सर्वांना स्वीकारार्ह आहे. किंबहुना नामस्मरण हे संपूर्ण आरोग्याचे, संपूर्ण विकासाचे, संपूर्ण उत्क्रांतीचे आणि संपूर्ण कल्याणाचे गमकही आहे आणि लक्षण देखील आहे!
विद्यार्थी: हे सर्व ठीक आहे. पण, नामस्मरणाने आपण व्यक्तीश: समाधानी होऊ शकतो हे पटकन अंगवळणी पडत नाही!
शिक्षक: खरे आहे! कोणत्याही वस्तूचा उपयोग आणि उपभोग आपल्या नेहमीच्या अनुभवातला असला, तर समजणे सोपे असते. कुंभ मेळ्यामध्ये जाणे, देवदर्शन करणे, साधुदर्शन करणे, तेथे स्नान करणे, पूजा करणे, प्रसाद खाणे, एकमेकांना भेटणे, परस्परांशी बोलणे; अशा बाबी नेहमीच्या अनुभवातल्या असल्यामुळे पटकन समजतात आणि पटतात.
पण नामस्मरणाचे तसे नाही. नामस्मरणाचा अनुभव “समजत” नाही! नामस्मरण करूनच तो घेता येतो. वर्णन करून तो देता-घेता येत नाही! नामस्मरण करता करता आपली संवेदना, वासना, भावना आणि बुद्धी स्वत:च्या क्षुद्र गरजा, मागण्या, आवडी, छंद, लहरी, अभिनिवेश, पूर्वग्रह यातून सुटतात आणि नामाशी म्हणजेच सच्चिदानंदाशी निगडित होत जातात म्हणजेच मुक्त होत जातात.
विद्यार्थी: या विवेचनाचा शरीक्रियाशास्त्राशी काही संबंध आहे का?
शिक्षक: तुझा प्रश्न एकदम रास्त आहे! होय! ह्या विवेचनाचा शरीक्रियाशास्त्राशी निश्चित संबंध आहे! शरीरक्रियाशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास; आपल्या वासना, भावना, विचार हे सर्व (आपण); नामाशी निगडित होत जाता जाता आपल्या शरीरातील वेगवेगळ्या रासायनिक आणि अंतस्त्रावी क्रिया-प्रतिक्रिया, चयापचयाच्या क्रिया, मज्जासंस्थेतील घडामोडी आणि व्यक्ती-व्यक्तीमधील परस्पर संबंध यांच्या प्रभावातून मुक्त होतात. यालाच देहबुद्धीचा प्रभाव कमी होणे म्हणतात. देहबुद्धी कमी होणे म्हणजेच पाप कमी होणे!