Aug19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 19th August 2015
संजीवक परिणाम: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: सर, ह्या कुंभ मेळ्याच्या निमित्ताने; आपल्या संपूर्ण वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर होणारे; नामस्मरणरुपी अमृतमंथनाचे संजीवक परिणाम मला तपशीलवार समजावून घ्यायचे आहेत!
शिक्षक: तुझी जिज्ञासा मला फारच कौतुकास्पद वाटते. एरवी; काहीजण कुंभमेळ्याकडे धार्मिक कडवेपणाने पाहतात, काहीजण न्यूनगंडातून पाहतात, काहीजण तुच्छतेने पाहातात, काहीजण भाबड्या भक्तिभावाने पाहतात, काही जण राजकीय फायद्या-तोट्याच्या दृष्टीने पाहतात, तर काहीजण आर्थिक नफ़ा-नुकसानीच्या दृष्टिकोनातून पाहतात. याशिवाय, काहीजण अचंबित होऊन पाहतात तर काहीजण भारावून जाऊन पाहतात. पण निखळ जिज्ञासेने आणि तितक्याच प्रामाणिकपणे क्वचितच कुणी कुंभ मेळ्याचा आणि एकूण समाजकल्याणाचा अभ्यास आणि विचार करतो!
नामस्मरणाने नामाशी म्हणजेच आपल्या अंतरात्म्याशी किंवा ईश्वराशी म्हणजेच अमृताच्या उगमाशी आपले नाते जुडते. किंबहुना आपले विचार, भावना, वासना आणि आपल्या कृती म्हणजेच आपला धर्म किंवा स्वधर्म येथूनच उगम पावतो किंवा प्रगट होतो. परिणामी; आपण आपापल्या क्षेत्रात अत्युत्तम काम करून कृतार्थ होऊ लागतो. ह्या कृतार्थतेमध्ये वैयक्तिक जीवनाचे जसे सार्थक आहे, तसेच वैश्विक सामाजिक जीवनातील सलोखा आणि सुसंवाद आणि सहकार्य आहे. म्हणूनच नामस्मरण, स्वधर्म आणि विश्वधर्म हे अतूटपणे संलग्न आहेत!
नामस्मरणरुपी अमृतमंथनातूनच विश्वकल्याणाची दृष्टी, इच्छा, विचार, योजना, धोरणे आणि कार्यक्रम प्रभावीपणे आविष्कृत होतात. उलटपक्षी, आपण जे जे करतो, ते ते, जर नामस्मरणरुपी अमृताची प्राप्ती करून देत असेल तर खरोखर व्यक्ती आणि समाजाच्या संपूर्ण कल्याणाचे होत असते हे देखील तेवढेच खरे!
विद्यार्थी: तुम्ही जे सांगता आहात, त्यावरून असे जाणवते आहे की, खरोखरच नामस्मरणाइतकी अहिंसक, सर्वतोपरी कल्याणकारी, पवित्रतम आणि त्याचबरोबर सामर्थ्यशाली अशी कृती नाही! विद्यार्थी: एका अर्थाने पाहिले तर; नामस्मरणाची शिकवण हा एक महान अमृतकुंभच आहे!
शिक्षक: नामस्मरण रुपी अमृतमंथन पुन्हा पुन्हा आपल्याला संजीवनी देत राहते आणि आपल्याकरवी अमृताचे सिंचन घडवून आणीत राहते! कुंभमेळ्याच्या मागील कल्याणकारी हेतू जपायचा आणि जोपासायचा असेल तर सर्वंकष कल्याण साधणारऱ्या नामस्मरणाला; अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या देशात करोडो लोक दारिद्र्यरेषेच्या खाली जगतात त्या देशात तर नामस्मरणरुपी अमृताचे महत्व आणखीच जास्त आहे!