Aug20
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Thursday, 20th August 2015
हेच एक मोठ्ठे आश्चर्य: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: मला वेगवेगळ्या कारणांसाठी कुंभ मेळ्याविषयी कुतुहूल वाटते! सर्वात महत्वाचे म्हणजे इतक्या प्राचीन काळी ह्या चार ठिकाणच्या सिंहस्थाच्या ग्रहस्थितीचा वेध घेणे, गणित मांडणे, त्या ग्रहस्थितीचे विवक्षित महत्व समजणे; हेच एक मोठ्ठे आश्चर्य आहे!
त्याचप्रमाणे, कोट्यावधी लोकांना ह्या विशिष्ट पर्वणीचे एवढे महत्व वाटणे आणि त्यांनी सर्व नफा-नुकसान बाजूला ठेवून ह्या पर्वणीच्या निमित्ताने स्नानासाठी येणे; आणि पिढ्यान-पिढ्या येत राहणे हे दुसरे मोठ्ठे आश्चर्य आहे! सर्वच बाबी राजकीय किंवा आर्थिक निकषांवर अभ्यासणे, पारखणे आणि निकालात काढणे हे चुकीचे आहे, सदोष आहे, अयोग्य आहे. एवढा मोठ्ठा मेळा आणि एवढ्या सातत्याने शतकानुशतके चालू राहतो, यात केवळ आर्थिक किंवा राजकीय स्वार्थ दिसणे, किंवा पारंपारिक अंधश्रद्धा असल्याचे आढळणे, हे मला हृदयशून्य आंधळेपणाचे वाटते! पण त्याचबरोबर त्याबद्दल साधक बाधक विचारच न करणे हे मला अगदीच निर्बुद्ध आडमुठेपणाचे आणि हेकटपणाचे वाटते!
शिक्षक: खरे आहे. संपूर्ण व्यक्ती आणि समाजाच्या हिताचे काहीतरी असल्याशिवाय कोणतीही परंपरा चालू राहू शकत नाही; हे जसे खरे, तसेच प्रत्येक परंपरेमध्ये देशकालमानानुसार काही दोष उत्पन्न होऊ शकतात; हे देखील खरे आहे! त्यामुळे निखळ जिज्ञासेतून आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे अभ्यास करणे; आणि तो देखील शुद्ध अंत:करणाने, निस्पृह भावनेने आणि पूर्वग्रहविरहित बुद्धीने करणे; हे महत्वाचे आहे! नामस्मरणरुपी अमृताने जेव्हां चित्तशुद्धी होते, तेव्हां हे शक्य होते!
विद्यार्थी: कुंभ मेळ्याची परंपरा जेव्हां केव्हां सुरु झाली तेव्हांची आणि आत्ताची परिस्थिती ह्यांमध्ये फरक आहे. आजच्या औद्योगिकीकरणाच्या, लोकसंख्येच्या वाढीच्या, प्रदूषणाच्या, जंगल तोडीच्या, निसर्गाच्या लहरीपणाच्या आणि विशेषत: संकुचित आणि तात्कालिक स्वार्थाच्या बाजारबुणग्या मूल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर; कुंभ मेळ्याचे पुनरावलोकन आणि पुनर्मुल्यांकन व्हायला नको का? तसे काही प्रमाणात जरी आपल्याला करता आले तरी ते सर्वांच्या हिताचे ठरेल!
शिक्षक: मला असे वाटते की सर्व प्रथम; ह्या पर्व काळामध्ये कुंभ मेळ्याच्या जागी कोणते कल्याणकारी बदल होतात ह्याचा सखोल, सातत्यपूर्ण, चिकाटीने आणि दीर्घकाळ अभ्यास होणे अत्यावश्यक आहे. असे झाले, आणि अशा बदलांचा छडा लागला, तर पुढे हा देखील विचार करता येईल; की असे बदल अन्य मार्गाने घडवून आणून; कुंभ स्नान करू न शकणाऱ्या इतर सर्वांनाही त्यांचा फायदा मिळवून देता येतील का? अन्यथा हे तरी कळेल; की कुंभ मेळ्याच्या ठिकाणी असे काही महत्वपूर्ण बदल घडतच नाहीत!