Aug20
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Thursday, 20th August 2015
गुरुपौर्णिमेचे महत्व: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: सर, कुंभ मेळ्यामध्ये आलेले अनेक साधू आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपापल्या आश्रमात, मठात, गावी गेले आहेत. कृपया गुरुपौर्णिमेचे महत्व सांगा ना!
शिक्षक: गुरुचे महात्म्य गुरुगीता ह्या प्रख्यात ग्रंथात भगवान शिवानी माता पार्वतीला सांगितले आहे. गुरुचे समर्पक वर्णन खालील श्लोकात आले आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: l
गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै: श्री गुरवे नम:ll
गुरु हा; ब्रह्मा, विष्णू आणि शंकर; म्हणजे सत्व, रज आणि तम हे तीनही गुण आणि गुणातीत परब्रह्म तत्व आहे. त्याला नमस्कार असो.
काहींच्या मते आद्य गुरु भगवान शिव ह्यांनी गुरुपौर्णिमेला त्यांच्या सात शिष्याना (विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ आणि कश्यप हे सात ऋषी) योग शिकविला.
काहींच्या मते, गुरुपौर्णिमेला भगवान महर्षी व्यास यांचा पराशर ऋषी आणि सत्यवती माता यांच्या पोटी जन्म झाला.
काहींच्या मते, गुरुपौर्णिमेला विश्वातील गुरु तत्वाचा कल्याणकारी प्रभाव १००० पट अधिक असतो.
काहींच्या मते, गुरुपौर्णिमेला भगवान व्यास महर्षीनी ब्रह्मसूत्रे लिहून पूर्ण केली.
विद्यार्थी: गुरु आणि शिक्षक ह्यात काय फरक आहे?
शिक्षक: गुरुची व्याख्या करणे शक्य नाही. कारण जिथे आपली बुद्धी आणि कल्पना पोचू शकत नाही, तिथे गुरुचे अस्तित्व असते. किंबहुना, गुरुचे असणे; “असणे आणि नसणे” ह्या कल्पनांच्या पलिकडे असते.
गुरु-शिष्याचे नाते कळले तर गुरु आणि शिक्षक ह्यांतील फरक थोडासा स्पष्ट होईल. गुरु-शिष्याचे नाते जन्म-जन्मांतरीचे असते. गुरु देहात असो वा नसो त्याचे संरक्षक सान्निध्य शिष्याला जाणवत राहते. त्याच्या सान्निध्यात मनाला आत्यंतिक समाधान वाटते. त्याच्या विचारांनी मनाला अनंत उर्जा मिळत राहते. त्याच्या संकल्पात जीवनाची सार्थकता आणि कृतार्थता वाटते. त्याच्या आठवणीत मनाला संपूर्ण स्वास्थ्य लाभते, आणि त्याच्यापासून कधीही दूर जावेसे वाटत नाही. गुरुपासून शिष्याला काहीही लपवावेसे वाटत नाही. गुरु; त्याच्या शिष्याकडून; शिष्याच्या संपूर्ण कल्याणाव्यतिरिक्त; कधीही कोणतीही अपेक्षा करीत नाही. पण गुरुसाठी आपले सर्वस्व; अगदी आपला जीव देखील; ओवाळून टाकायची शिष्याची एका पायावर तयारी असते! शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचे नाते थोडाफार फरकाने सर्वांना परिचयाचे असल्यामुळे त्याचे वर्णन करण्याची आवश्यकता नाही.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वांनी गुरुची शिकवण आस्थेने आणि उत्कटतेणे अंगिकारावी आणि त्यांच्या इच्छेनुरूप आनंदाने इतरांना सांगावी.