Aug20
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Thursday, 20th August 2015
सुखाचा सागर : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: केवळ कुंभ मेळा नव्हे तर; एकंदरीतच धर्माचे बाह्य अवडंबर अधिक लोकप्रिय दिसते. किंबहुना एकूणच जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत प्रदर्शनाला अधिक महत्व आलेले दिसते. त्या मानाने नामस्मरण तेवढे लोकप्रिय दिसत नाही. बाह्य बाबी आपले मन पटकन आकर्षून घेतात; खरे ना?
शिक्षक: होय. अगदी खरे आहे. आपण जेव्हां स्वत:च्या; मूळ किंवा खऱ्या स्थितीपासून, अवस्थेपासून, स्थानापासून म्हणजेच स्वरूपापासून; नामविस्मरणाच्या ओढीने खेचले जाऊन; जडत्वामध्ये जखडलेले असतो, तेव्हां आपण; पाशवी वासना, क्षुद्र भावना, संकुचित विचार आणि तदनुषंगिक संकल्पात आणि कार्यात गुरफटून राहतो. जो अंतरात्मा किंवा आपली मूळ स्थिती आपल्या अंतर्यामी आणि आपल्या बाहेर; सर्वत्र पसरलेला सुखाचा सागर आहे, त्याच्यापासून तुटल्यामुळे आपण वारंवार सुख आणि दु:ख यांच्या हेलकाव्यात सापडतो. ह्या आत्मभ्रष्ट अवस्थेत; यशाचा भपका असो की अपयशाचा अंधार; आपण कायम दुबळे आणि अतृप्त राहतो!
विद्यार्थी: हे अगदी मनापासून पटते. केवळ कुंभ मेळा किंवा यात्राच नव्हे; तर; जीवनातील सर्वच दिखाऊ आचार विचारात आपण नेहमीच रुतलेले असतो!
शिक्षक: पण; नामस्मरणामुळे; काही प्रसंगांतून आणि अनुभवांतून समजू लागते की; नाम हाच ईश्वर, गुरु, ब्रह्म इत्यादी असून; नाम हाच सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्व शक्तिमान आणि सर्व सत्ताधीश परमात्मा आहे; आणि आपण करीत असलेल्या नामस्मरणासकट आपले सर्वस्व; ह्या नामात उगम पावते, नामावर जगते, नामाने नियंत्रित होते, नामाच्या योगाने बहरते, आणि नामातच लय पावते! पुढे; हे देखील लक्षात येते की; वास्तविक पाहता; नाम आणि माझा अंतरात्मा किंवा खरा “मी” एकच आहोत; फरक एवढाच; की जोपर्यंत मी नामविस्मरणा च्या स्थितीत होतो, तोपर्यंत माझा खरा “मी”; मला दुर्गम आणि दुर्लभ होता, किंवा अगम्य आणि अलभ्य होता!
पुढे आपल्या अथांग आणि अमर्याद अंतरात्म्याशी म्हणजे “नामाशी” जोडले गेल्यामुळे; संकुचित दृष्ट्या; आपण श्रीमंत असो वा गरीब, मोठे असू की लहान, गोरे असू की काळे, नेते असू की अनुयायी, निरोगी असू की रोगी आणि यशस्वी होवो की अयशस्वी; आपण क्षुल्लक लाभ-हानि च्या भ्रमामध्ये भरकटत नाही! ह्यालाच मूल्यव्यवस्था परिवर्तन असे म्हणतात आणि हाच वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्याचा गाभा आहे!