Aug20
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Thursday, 20th August 2015
संभ्रम आणि संशय : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: कुंभ मेळ्याच्या संदर्भात आणखी एक प्रश्न येतो. या ठिकाणी येणाऱ्या साधूंच्या आचारावरून, त्यांच्या उत्पन्नावरून आणि त्यांच्या रहस्यमय पार्श्वभूमीवरून पुष्कळदा संभ्रम आणि संशय निर्माण होतो. आमच्यासारख्या सामान्य माणसांनी समाजकल्याणाच्या दृष्टीने पाहता; ह्यातून काय शिकायचे?
शिक्षक: माझ्या मते, कुंभ मेळ्यामध्ये वेगवेगळ्या मार्गांनी चैतन्याची साधना करणाऱ्या महान साधकांच्या परंपरा असतात. खऱ्या अर्थाने पाहता; त्या परंपरा म्हणजे; अनादी आणि अनंत अशा अदृश्य विश्वचैतन्याच्या धारा, त्याचे दृश्य कृपाप्रवाह आणि त्याचे दृश्य ओघ आहेत. अव्यक्त अमृताचे व्यक्त स्रोत आहेत! ह्या वेगवेगळ्या काळांमधील वेगवेगळ्या परंपरांनी त्या त्या काळातील राज्यकर्ते, उद्योजक, व्यापारी, इतर धनिक लोक आणि सेवाभावी संस्था यांच्या हृदयात अत्युच्च आदराचे स्थान मिळविले आणि त्यांच्याकडून राजकीय, आर्थिक इत्यादी सर्वच क्षेत्रांमध्ये चैतन्यप्रचीतीला पोषक असे कार्य घडविले. ह्या परंपरांनी अंतर्बाह्य व्यापणाऱ्या विश्वचैतन्याशी निगडीत होण्याचे अनेक मार्ग खुले आणि प्रचलित ठेवले आहेत! त्या सर्वांमध्ये अंतरात्म्याचे स्मरण हे सर्वांना समान आहे! त्यामुळे नामसाधनेची चैतन्यधारा ह्या सर्व परंपरांमधून आज प्रामुख्याने आणि अव्याहतपणे वाहत आहे! ह्या चैतन्यधारेच्या कळत नकळत होणाऱ्या परिणामामुळेच; सत्य, शिव आणि सुंदर यांचे अस्तित्व; अनेक प्रकारचे हल्ले परतवून आणि आघात पचवून आज समर्थपणे टिकले आहे आणि एवढेच नव्हे तर जगाच्या हृदयावर अधिराज्य गाजवीत आहे!
विद्यार्थी: कुंभ मेळ्यासारख्या प्रथा “आत्मनो मोक्षार्थम् जगत् हिताय च” म्हणजे “स्वत:ची मुक्ती आणि जगाचे हित व्हावे” ह्याच उदात्त हेतूने आणि भावनेतून निर्माण आणि रूढ होतात का?
शिक्षक: नि:संशय! इथे येणारे पुष्कळसे साधक आणि साधू; प्रापंचिक वा संकुचित स्वार्थामध्ये अडकलेले नसतात. ते निर्दोष नसतील कदाचित. पण सत्याच्या मार्गावरचे पथिक तरी निश्चितच असतात. त्याचप्रमाणे कुंभ मेळ्यासारख्या प्रथा सर्वस्वी निर्दोष नसतील तरी; ढोबळ मानाने पाहता; त्या प्रथांचे प्रयोजन समाजाचे शोषण करण्याचे वा समाजघातकी नसते. दुष्ट नसते. तिथे येणारे सर्वच साधक आणि साधू सर्वज्ञ नसतील. किंबहुना त्यांचाही तसा दावा असत नसावा.
पण अशा तऱ्हेने नि:पक्षपाती आणि पूर्वग्रहविरहित डोळसपणाने पाहण्यासाठी आपण नामस्मरण करणे अत्यंत जरुरीचे आहे. कुंभ मेळ्यामध्ये देखील आपल्याला असे कितीतरी आखाडे आढळतात, जिथे अखंड नामजप, नामसंकीर्तन किंवा नामधून चालू असतात!